उन्मादाला ‘चपराक’ अशी बसेल की... संजय पवार


आम्हाला कायमच असं वाटत आलं, किंबहुना ते आमचं ठाम मतच आहे असं समजा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजेच आरएसएस तथा संघ परिवार म्हणून जो काही आहे, त्याचा आवाका मर्यादित, आव मात्र खंडीभर. मुळात नावात राष्ट्रीय असलेल्या या संघटनेला नेमके कोणते राष्ट्र अपेक्षित आहे हे आता सर्वांना माहीत आहे. त्यांना राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणायचं असतं. हे हिंदू राष्ट्र त्यांना ब्राह्मणी वर्चस्वाच्या हिंदू धर्माचं राष्ट्र म्हणून अभिप्रेत आहे.
पण ५४, ५५, ५६ किंवा ५७ इंची छातीवर हात ठेवून तसं स्पष्ट म्हणायची धमक संघाच्या जन्मापासून आजतागायत त्यांच्यात नाही. गुळगुळीत, मुळमुळीत काहीतरी बोलत राहायचं. हिंदू बहुसंख्य म्हणजे हे हिंदू राष्ट्रच आहे. सोयीने ते हिंदू धर्माभिमानी असतात आणि सोयीने हिंदू एक जीवनपद्धती असंही म्हणतात. असं म्हणताना मग इथले बिगर हिंदू मिहणजे शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुसलमान हे पण त्या अर्थाने हिंदूच. अत्यंत पाताळयंत्री, दामटून खोटे बोलणं आणि अंगाशी आलं की, दात फिस्कारून हसणं ही या परिवाराची वैशिष्ट्यं आहेत. इतर धर्मियांबद्दल विशेषत: मुसलमानांबद्दल अत्यंत विखारी, विषारी प्रचार-प्रसार, कुजबूज हे त्यांचं मुख्य कार्य. आणि सगळ्यात महत्वाचा विशेष म्हणजे सोयीने माणसं वापरायची आणि गैरसोय झाली की फेकून द्यायची.
संघ परिवार काहीतरी भयंकर सेवाकार्य निरपेक्ष भावनेनं करत असतो असा एक प्रचार केला जातो. संघाचं सेवा कार्य म्हणजे काय? शाखा भरवणं (स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या), वनवासी कल्याण आश्रम, संस्कार भारती, अभाविप अशा संघटना संस्था चालवायच्या. तिथंही ढोंगबाजी असतेच. म्हणजे वरचा मुखवटा सेवाव्रती किंवा बलशाली राष्ट्र निर्माणाचा, पण आतला चेहरा ब्राह्मणी वर्चस्ववादी सनातन हिंदू धर्माचा.
स्वत:ला आर्य म्हणवून घेताना, ते खैबर खिंडीतून आले नाहीत तर ते इथंच होते, हे सिद्ध करण्यासाठी जो मूळचा या भूप्रदेशावरचा, या मातीतला माणूल आहे, ज्याला जग आदिवासी, ट्रायबल म्हणून ओळखतं, त्याला यांनी वनवासी बनवला! वनात राहणारा तो वनवासी! कारण त्याला जर आदि म्हटलं तर आर्य इथलेच हे रेटता येत नाही. वनवासी कल्याण आश्रमाचं काम काय? म्हणजे वरकरणी शाळा, दवाखाने इत्यादी सगळं असतंच, पण अंतर्गत हेतू या आदिवासींची जी आदिम संस्कृती आहे, ती मातीऐवजी गेरूने सारवून त्यावर ब्राह्मणी हिंदुत्वाची रांगोळी काढायची. त्यांची आदिम कैरू, वाहरू वगैरे नावं बदलून केशव, दीपक करायची. त्यांच्या निसर्गदेवतेला झाकून तिथं राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मग हळूहळू शिवलिंग वगैरे करत सरस्वती, गणपती सगळे आणायचे. हे असलं भगवेकरण म्हणजे वनवासी कल्याण! यासाठीचा मोठा निधी परदेशस्थ ब्राह्मणांकडून येतो आणि इथल्या नवश्रीमंत गरीब ब्राह्मणांकडून, गुजराती व्यापाऱ्यांकडून.
गुजरात दंगलीत मुसलमानांच्या विरोधात याच आदिवासी व इतर मध्यम जातींना वापरण्यात आलं. संघ जातीवर बोलत नाही. जातीअंताच्या लढाईवर बोलत नाही, पण संघ आमच्यात किती आंतरजातीय विवाह झाले, आमचे ओबीसी, एससी, एसटी आमदार, नगरसेवक, खासदार, मंत्री किती हे उच्चारवाने सांगत असतो. पण म्हणून जात संपवण्याची समतेची भाषा न वापरता समरसतेची भाषा वापरतो.
म्हणजे जातीनिहाय विषमता तशीच ठेवून सगळ्यांनी समरस होऊन रहा! संघ जातीव्यवस्थेविरुद्ध कधीच बोलत नाही कारण जातीव्यवस्थेवर बोललं की, ब्रह्मणी वर्चस्वावर बोलावं लागेल, अस्पृश्यता, स्त्रीदास्य यावर बोलावं लागेल. ब्राह्मणी वर्चस्वाखालील हिंदू धर्माचा इतिहास, शिक्षण, रोटी-बेटी बंदी, मंदिर बंदी, सती, बालविवाह, विधवा केशवपन, त्या विधवांचे अघोरी गर्भपात असा सगळा काळा इतिहास आहे या हिंदू परंपरेचा. आणि संघ परिवार याच परंपरेच्या अभिमानावर, विचारावर चालतो. गायीला गोमाताम्हणणारे हे बाईला दासी करतात. कनिष्ठ जातींना गुलाम तर क्षत्रिय, वैश्यांना आपल्या पुरोहितशाहीने बांधून ठेवतात.
आता अनेकांना वाटेल, तुम्ही तेच तेच, जुनं उगाळत बसता! आता कुठे लोक जातपात पाळतात, ब्राह्मण तरी कुठे ब्राह्मण्य सांभाळतात? ते तर मदिरापान, अभक्ष्यभक्षणही करतात. बाई दासी कुठे? आता तर बेटी बचाव, बेटी पढाव अशी धोरणे आखली जाताहेत. वरकरणी हे खरंच आहे. कदाचित आकडेवारीही दाखवली जाईल. पण अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून जेवढ्या म्हणून सामाजिक समतेच्या लढाया झाल्या, तेव्हा संघ कुठे होता? कुठली मौलिक, ऐतिहासिक, सामाजिक सुधारणा संघ परिवार अथवा त्यांच्या नेत्यांच्या नावावर जमा आहे? संघ गोखले, आगरकर, महर्षी कर्वे, र. धो. कर्वे यांच्या मागे उभा होता? तो फुले-शाहू-आंबेडकराच्या मागे होता?
संघाने चवदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रहात भाग घेतला? संघाने सतीप्रथा, बालविवाह, विधवांचं केशवपन, गर्भपात बंद करवले? स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली केली? संघात स्त्रिया नसतात. त्यासाठी वेगळी समिती आहे. त्यातल्या स्त्रियांना आमचे आवाहन आहे – त्यांना संघाच्या शीर्षस्थ नेत्यांना, सरसंघचालकांना विचारावं की, या अमानुष प्रथांविरोधात संघाने कधी पुढाकार घेतला? घेतला तर कधी? कुठे? आणि नसेल घेतला तर का नाही?
संघात किंवा भाजप, अभाविप, संस्कार भारतीमध्ये असणाऱ्या मध्यम जातीतील संवयंसेवकांनी, कनिष्ठ जातीतील स्वयंसेवकांनी आपल्या नेत्यांना विचारावं – समतेच्या लढ्यात आपण कधीच नव्हतो, मग आपण समरसतेचा ढोल का पिटतो?
अलिकडे परिवाराशी संबंधित अभ्यासक, संशोधक, यांचं एक संमेलन सरसंघचालक मोहन भागवतांनी दिल्लीमध्ये घेतलं. तेव्हा उपस्थितांना त्यांनी विचारलं की, नवीन कुणी काही लिहिलं? संशोधन केलं? त्यांनी हात वर करा. सभागृहातले सगळे शोलेतले संजीवकुमार झालेले! एक हात काय, बोट वर नाही. भागवत निराश झाले. त्यांनी मग एक बौद्धिक घेतलं आपल्या उपक्रमांना वैशिष्ट्यपूर्ण नावं देण्यात संघ परिवार पटाईत. उदा. बौद्धिक. पण कुठल्या स्वयंसेवकाच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्ता दिसते? संघ परिवाराची दिवाळखोरी एवढी, यांच्याकडे ना संशोधक, ना शास्त्रज्ञ, ना कलावंत, ना खेळाडू. शाखेवर लाठी फिरवली, सूर्य नमस्कार घालून बलोपासना केली, पण कुणा स्वयंसेवक ठाणे महापौर मॅरेथॉनमध्ये तरी पहिला आलाय? दंड, बैठका काढून कुणी तरी राष्ट्रीय खेळाडू झालाय? मग त्यांच्या हाती गजेंद्र चौहान, पहलाज निहलानी, अशोक पंडित लागणार! दीनानाथ बात्रांसारखे गंगा उलटी वाहवू पाहणारे शिक्षणतज्ञ सापडणार! बोकीलांसारखे अर्थतज्ञ जन्माला येणार!!!
२०१४ पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने इतर पक्षातून विजयी होणारे उमेदवार आयात केले. यात राजकीय वजन असलेले जर घेतले, तसे नामचीन गुंडही घेतले. इतक्या वर्षांचा इतिहास, शाखा वाढल्या, पक्ष सदस्यसंख्या जगात नंबर एक, मग उमेदवार मनसे, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी, बसपचे का लागतात?
अशा किंवा या आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं भागवत देणार नाहीत, ना मोदी, ना शहा, ना फडणवीस. कारण छुपा अजेंडा हाच त्यांचा मुख्य अजेंडा असतो. मुद्दे भरकटवणं, जातीय-धार्मिक ध्रुवीकरण करणं हेच यांचं खरं काम. बाकी मुँह में राम, बगल में छुरी हेच धोरण.
आज हे सर्व लिहिण्याचं कारण काय?
राजकीय यशानं संघ परिवाराला जो उन्माद चढलाय, त्यावरून गोहत्या, राममंदीर आदि विषयांवर शिरच्छेदापर्यंत जिभा सैल सुटल्या आहेत, तर कुणी तरुण विजय दक्षिणेत आम्ही काळ्यांबरोबर राहतोच की!’ म्हणून बेलगाम वर्णवर्चस्ववादी बोलतो!
कुठून आली ही हिंमत? भारतीय लोकशाही, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काडीचा सहभाग नसलेल्या संघ परिवाराने आपला हा हिंदू राष्ट्रवादाचा भगवा उन्माद थांबवावा. अन्यथा न्याय, समता, बंधुत्व आणि सामाजिक सलोखा मानणारा या देशातला सव्वाशे कोटी सच्चा भारतीय या उन्मादाला अशी चपराक देईल की, ज्याचा प्रतिध्वनी खैबर खिंडीतही ऐकू येईल!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे. असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे- रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर-

mahacpim@gmail.com

आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता-

Jeevan Marg
 
A/C Number- 04220100009541

 IFSC CODE- BARBOWRLIX

 Bank of Baroda, Worli Branch

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

जनावरांच्या विक्रीवरील बंदीचा आदेश मागे घ्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी (१) - सी. पी. भांबरी

मोदी सरकार : शेतकऱ्यांशी केलेल्या गद्दारीची तीन वर्षे!