राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी (१) - सी. पी. भांबरी
अलीकडेच
दिल्ली येथील रामजस महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हिंसक हैदोस
घालून आपले खरेखुरे (वि)रूप दाखवून दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार
झालेल्या अभाविप व अन्य संघटनांना हुकुमशाहीचेच बाळकडू मिळालेले आहे. तेच ते
त्यांचे खायचे दात, ‘लोकशाहीविरोधी चेहरा’ या घटनेने पुन्हा एकदा जगासमोर आणून ठेवला आहे.
त्यांच्या या हुल्लडबाजीला ‘न्यायनिवाडा करणारे कृत्य’ असे लेबल
चिकटवून चालणार नाही. ही वर्तणूक रास्वसंघाच्या शिकवणुकीचा परिपाक आहे, हे इथे
आवर्जून लक्षात घ्यावे लागेल. सबब रास्वसंघाची राजकीय तत्वप्रणाली, त्यांची
निर्मिती व जडणघडण तसेच भारतातील विद्यमान राजकीय वातावरणात गुरफटलेले त्यांचे लागेबांधे
अशा सर्व बाबींचा विस्तारपूर्वक परामर्श तीन लेखांमधून आपण घेणार आहोत.
आज
भारतीय प्रशासनाच्या नाड्या रास्वसंघाच्या कित्येक प्रचारकांच्या हाती एकवटलेल्या
आपण पाहतो आहोत. विशेष म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील भारतात प्रथमच अशी
परिस्थिती निर्माण झालेली असून त्याची अत्यंत गांभीर्याने दखल घेणे क्रमप्राप्त
आहे. नरेंद्र मोदींच्या सत्ताग्रहणानंतर लगेचच हरियाणा, झारखंड, छत्तीसगड इत्यादी
राज्यांमध्ये घडलेल्या घटना व त्या घटनांमध्ये त्या त्या ठिकाणच्या मंत्र्यांचा
सहभाग पाहता एक अतिशय घातक प्रथा सुरु होत असल्याची ही नांदी आहे. यावर कोणी सहजच
प्रतिवाद करील की, एवढे चिंताजनक आहे तरी काय? संघप्रचारक असले तरी आता ते राजकीय नेते म्हणून सत्तास्थानी आले आहेत.
ते देखील खुल्या वातावरणात रितसर निवडणुका लढवून व जिंकून आले आहेत. मतदारांनीच
त्यांना सरकार चालवण्याची परवानगी दिली आहे ना! मग काळजीचे कारण काय?
रास्वसंघाच्या देशातील राजकीय चढाईकडे अशा अलिप्त
भूमिकेतून पाहणे विलक्षण घोकादायक आहे. रास्वसंघ व अन्य राजकीय पक्ष यांचे मूलभूत
स्वरूपातील वेगळेपण लक्षात न घेतल्यामुळे असा ढिसाळ व बेजबाबदार दृष्टीकोन लोक
बाळगतात व स्वत:ची फसगत करून घेतात. वास्तविक प्रतिनिधित्वावर बहुसंख्य लोकशाही
राजवटींमध्ये सत्ताधारी वर्ग अगदी उघडपणे भांडवलास पायघड्या घालताना दिसतो. हे धन
अधिकाधिक पदरात पाडून घेण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या लढवतो. त्याचबरोबर आपण जे काही
करतो आहोत त्याला कोणी संपूर्ण विरोध करू नये, याची खबरदारी घेतो. हा सगळा व्यवहार
वरवर दिसतो तसा सोपा नाही. या प्रक्रियेत संपत्तीचे केंद्रीकरण व कामगारांचे
खच्चीकरण करण्यात येते व ते साध्य करण्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबण्यात येतो.
आपल्या या कृतीच्या समर्थनार्थ सत्ताधारी वर्ग स्वत:ला अनुकूल अशा तत्वज्ञानाचा
गाजावाजा करायला विसरत नाही. हा गाजावाजा त्यांच्या चांगलाच पथ्थ्यावर पडणारा
असतो. त्यासाठी ज्या माध्यमांचा वापर करण्यात येतो, त्यांचा सत्ताधाऱ्यांच्या या
कारवायांशी संबंध नसल्यासारखे मानले तरी ते खरे नसते. याच माध्यमांद्वारे
लोकांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकून त्यांची दिशाभूल करीत हे सत्ताधारी शासनाच्या
एकूणच साधनसामग्रीवर डल्ला मारण्यात यशस्वी होतात. हे अत्यंत गंभीर व धोकादायक आहे,
हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.
जो समाज
वर्गावर्गात विभागलेला आहे, जिथला बहुजन वर्ग दडपणुकीच्या वरवंट्याखाली भरडलेला
आहे, त्या समाजात सामाजिक, राजकीय कार्यक्रमाची आखणी करताना ‘विचारसरणी’ची
भूमिका महत्वाची ठरते. असे असेल तर रास्वसंघाची विचारसरणी
नीट तपासून घ्यावी लागेल. कारण आजमितीस तरी भारतीय समाजात रास्वसंघाने आपले हातपाय
सर्वदूर पसरले आहेत व त्यायोगे मध्यवर्ती स्थान पटकवण्याच्या मार्गावर आहे. भारतीय
जनजीवनातील मुख्य वैचारिक प्रवाहात त्याने मोठी आघाडी घेतली आहे. रास्वसंघ व
त्याच्याच चव्वेचाळीस भातृसंघटनांची वेगवान झेप दुर्लक्षित करण्यासारखी नाही. कारण
रास्वसंघाच्या या सर्व उलाढाली नरेंद्र मोदी सरकारच्या कृपाशिर्वादाखाली
निर्वेधपणे सुरु आहेत. नरेंद्र मोदींनी एकूण एक सरकारी यंत्रणांना आपली बटीक बनवले
आहे.
अटलबिहारी वाजपेयी व मोदी या दोघांच्या कारकिर्दीतील हा
एक मोठा लक्षणीय फरक आहे. अटलबिहारी वाजपेयीसुद्धा पूर्वाश्रमीचे संघप्रचारकच
होते, त्यांनाही १९९८ ते २००४ या त्यांच्या कार्यकाळात संघाच्याच देखरेखीखाली
संयुक्त आघाडी सरकार सांभाळावे लागले. मात्र त्यांनी सरकारी यंत्रणांना आत्ताच्यासारखे
वेठीस धरले नव्हते. वाजपेयींच्या पक्षाला त्यावेळी लोकसभेत संपूर्ण बहुमत लाभलेले
नव्हते. आजचे चित्र वेगळे आहे. २०१४च्या सोळाव्या लोकसभेत भाजपला संपूर्ण बहुमत
लाभलेले आहे. आता एकूण राष्ट्रीय मतांपैकी ३१ टक्के मतांचेच हे बहुमत आहे. पण ते ‘बहुमत’ आहे!
अशा
वाहत्या गंगेत रास्वसंघाने हात धुऊन
घेतले नाही तरच नवल! अनेक धर्म-पंथांनी गजबजलेल्या भारतीय समाजाचे ‘हिंदुकरण’ करणे हा रास्वसंघाचा
पायाभूत कार्यक्रम (अजेंडा) आहे. त्यासाठी यापूर्वी रास्वसंघ जिथे जिथे अस्तित्वात
नव्हता अशा ग्रामीण, शहरी व आदिवासी भागातील ठिकाणे हेरून तिथे तिथे आपल्या शाखा
उघडण्याचा धडाकाच रास्वसंघाने लावला आहे. रास्वसंघाचा संघटनात्मक विस्तार होताच
त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पेरणीचे व त्याआधारे ‘हिंदु
राष्ट्र’ प्रस्थापनेचे अल्प तसेच दीर्घकालीन कार्य त्यांना पार पाडावयाचे आहे.
हिंदुत्वाचा प्रचार करून हिंदुंचे नुसते संख्याबळ वाढवायचे नाही, तर त्यांना
ब्राह्मणी- वैदिक- संस्कृतप्रचुर हिंदुत्वाबाबतची आपली स्वतंत्र ओळख धारण
करण्याबाबत आग्रही बनवण्याचे उद्दीष्टही गाठायचे आहे. रास्वसंघाच्या प्रमाणग्रंथाच्या वाचन व प्रसारातून
हिंदूंना जागे करणे, आपणच भारताचे मूळ-निवासी असल्याची ठाम भावना त्यांच्या मनात
रुजविणे हे मूलभूत इतिकर्तव्य पार पाडायचे आहे. त्यातूनच भारतातील मुस्लीम,
ख्रिश्चन आदी मुख्य धर्मांहून आपण कुणीतरी वेगळे (खरं तर श्रेष्ठ) असण्याची जाणीव
मूळ धरील यासाठी हिंदू हेच ‘भारतमातेचे’ मूळ (स्वदेशी) रहिवासी
असण्याचा दावा करून त्याचा डंका पिटविण्यात येतो. ‘एक देश-
एक धर्म- एक भाषा’ म्हणजेच भारत, हा त्या विचार प्रणालीचा गाभा आहे.
१९२५
साली नागपूरात रास्वसंघाची स्थापना
करताना डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी हेच अंतिम उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवले होते. लाला
लजपतराय, पंडित मदनमोहन मालवीय व अन्य कैक नेत्यांनी त्यावेळी वसाहतवादी सरकार
विरोधात राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व केले होते. त्यांनी देखील ‘हिंदु
धर्म’, ‘गाय’, ‘हिंदी
भाषा’
इत्यादी प्रतिकांची पाठराखण व पुरस्कार केला होता. हिंदुत्वाला प्रकाशझोतात आणून
त्याचा फैलाव करण्यासाठी १९व्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकारंभी स्वामी
दयानंद सरस्वतींच्या नेतृत्वाखाली जोरदार चळवळ उभारण्यात आली होती. या चळवळीची
पार्श्वभूमी रास्वसंघाला असली तरी संघाच्या हिंदुत्व-
कैवारापेक्षा या चळवळीचे स्वरूप अतिशय वेगळे होते. १९४९-५०च्या सुमारास हिंदु
महासभेच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जींनी हिंदुंच्या हक्कांच्या संरक्षणार्थ जनसंघाची
(आताचा भाजप) स्थापना केली. रास्वसंघाचे तत्कालीन सरसंघचालक म.स. गोळवलकरांनी
अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी हे दोन संघप्रचारक मुखर्जींना सहाय्यक म्हणून
दिले. रास्वसंघाचा हा ऐतिहासिक प्रवास लक्षात घेता त्याच्या आजच्या हालचालींकडे
दुर्लक्ष करणे परवडणार नाही. रास्वसंघाचे बाळकडू पीत वाढलेल्या अन्य चव्वेचाळीस
हिंदुत्ववादी संघटनांच्या तत्वज्ञानाचा गाभा हिंदुत्वाचे मुख्य तारणहार हा आहे.
तेव्हा संघासहित या संघाचे निष्ठावंत सैनिक व कार्यकर्तेच आज भाजप संचालित केंद्र
व राज्य सरकारांच्या महत्वपूर्ण निर्णयांचे खरे सूत्रधार बनले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय?
मुळात
ही ब्राह्मण संघटना आहे. महाराष्ट्रातील पेशव्यांचा ध्वज ‘भगवा’ होता.
तोच यांचाही आहे. मुस्लीम-मोगल राजवटीला कडवी झुंज देणारा ‘राजा
शिवाजी’ हे
आमचे नायक आहेत, असा प्रचार ते करतात. शिवाजी व महाराणा प्रतापांसारख्यांचा दैवी
व्यक्तिमत्व म्हणून ते गौरव करतात. मुस्लीम, ख्रिश्चन व अन्य अल्पसंख्याक
समाजाबरोबरच्या वैर भावनेवर यांचे तत्वज्ञान पोसलेले आहे व तग धरून आहे. मुस्लीम व
ख्रिश्चनादी समाज ‘उपरा’ आहे. कारण त्यांचे धार्मिक
मानबिंदू असलेली मक्का-मदिनादी धर्मस्थळे तसेच पोप व ख्रिश्चन चर्चेस या बाबी
भारतीय सीमाक्षेत्राबाहेर आहेत.
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा पाया ‘धर्म’ हाच
आहे. संघाच्या संघटनात्मक रचनेत त्याचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले आहे. १९२५ साली
के.ब. हेडगेवारांनी संघ स्थापन करतानाच त्यामागील हेतू स्पष्ट केला होता. ते
म्हणाले, “आपल्या जन्मभू व पुण्यभूचे संरक्षण करण्यासाठी हिंदूंनी पुरेसे मजबूत
बनले पाहिजे. आपल्या विरोधकांच्या विशेषत: मुस्लीमांच्या हल्ल्यांविरोधात ठामपणे उभे
राहण्याची ताकद हिंदूंनी कमविली पाहिजे.”
डॉ.
हेडगेवारांनी संघटनेच्या स्वरूपाबाबत काही लेखन केलेले नव्हते. मात्र त्यांच्या
फौजेतल्या बिनीचा सैनिक असलेल्या बी.एस, मुंजे यांनी संघटनेच्या उद्दीष्टांबाबत
अटी व महत्वाचे मुद्दे उपलब्ध करून दिले आहेत.
संघाची
संघटना
१९२५ ते
२०१७ एवढा प्रदीर्घ कालखंड घेतला तरी रास्वसंघाच्या
त्या वेळची एक गोष्ट काडीमात्र बदललेली नाही हे लक्षात येते. घट्ट अशी श्रेणीबद्ध
रचना हे या संघटनेचे मूलभूत वैशिष्ठ्य कायम आहे. या श्रेणीत सरसंघचालक हे सर्वोच्च
स्थानी असतात. संघाच्या प्रतिनिधी सभेत ज्येष्ठ सदस्यांचा समावेश असतो. ते
सरसंघचालकांचे विश्वासू सहकारी व संघ प्रचारक असतात. बी.एस. मुंजे हे सुद्धा
प्रमुख प्रचारक होते. बेनिटो मुसोलिनी या हुकुमशहाला ते स्वत: जाऊन
भेटले होते. असा हुकुमशहा व त्याची हुकुमशाही संघटना कशी आदर्श आहे, याचे गोडवे
गात मुंजेंनी त्यांची प्रतिमा स्वयंसेवकांच्या मनावर ठसवण्यात मोठे यश प्राप्त
केले. ‘बालील्ला’ या
तरुणांच्या संस्थेत मुसोलिनीच्या फौजेची पायाभरणी होत असे. किंबहुना इटलीच्या लष्कराच्या
पुनरुत्थानाच्या हेतूनेच उभारलेली लष्करी संघटना म्हणजे बालील्ला. मुसोलिनीच्या
भेटीत मुंजेंनी ‘बालील्ला’चे समक्ष निरिक्षण केले होते.
“हुकुमशाहीच्या
माध्यमातूनच लोकांमध्ये एकीची भावना निर्माण होते. भारत- खरं तर हिंदू भारतासाठी हिंदूंचे
सैनिकीकरण करणाऱ्या संस्थेची गरज आहे. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हिंदूंमधील लढाऊ
आणि बिगर लढाऊ जमातींनुसार वर्गवारी करून ठेवली होती. ती वर्गवारी कदाचित नाहिशी
होईल. डॉ. हेडगेवारांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला आपला रास्वसंघ असा लढाऊ
बाण्याचा आहे, त्याची निर्मिती सर्वार्थाने स्वतंत्रपणे झालेली असून डॉ.
हेडगेवारांनी उभारलेल्या या संस्थेच्या विकासासाठी महाराष्ट्रासह अन्य प्रांतांत
प्रसार करण्याच्या कामासाठी मी माझे उर्वरित आयुष्य खर्च करीन.”
“राष्ट्रीय
स्वयंसेवक संघातील सदस्यांना लष्करी प्रशिक्षण देणे हे या हिंदू संघटनेचे खास
वैशिष्ठ्य आहे. भारतमातेचे तिच्या विरोधकांपासून संरक्षण करून मुस्लीमांचा पुरेसा
बंदोबस्त करण्यासाठी पुरेशी लष्करी ताकद कमवावी लागेल. संघाच्या शाखा हिंदूंना
त्या दृष्टीने प्रशिक्षित करतील. आता जर्मनीतील नाझी व मुसोलिनीच्या इटलीतील फॅसिस्टांप्रमाणे
त्यांना घडवायचे आहे. ते मनाने तरूणच असले पाहिजेत. हिंदू युवकांना वैचारिक व
शारीरिक प्रशिक्षण देण्यासाठी रास्वसंघ आपल्या शाखांवर दैनंदिन सभा भरवित असतो.”
संघाची
ही वैचारिक बांधिलकी डॉ. के.ब. हेडगेवारांपासून ते मोहन भागवतांपर्यंत सर्व
स्वसंसेवकांमध्ये आलेली आहे. ४ मार्च २०१६ रोजी मोहन भागवतांनी केलेले विधान
म्हणूनच लक्षणीय आहे. ते म्हणाले, “भारतमाता की जय या घोषणेविरुद्धचा उद्घोष फारच
वाढत चालला आहे. लोकांना आज शिकवावे लागते की ‘म्हणा, भारतमाता की जय.’ हे बरोबर नाही. मातृभूमीबद्दलच्या तुमच्या भावना
अगदी सहज उपजल्या पाहिजेत.”
(क्रमश:)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे. असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे- रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर-
mahacpim@gmail.com
आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता.
Jeevan Marg
A/C Number- 04220100009541
IFSC CODE- BARBOWRLIX
Bank of Baroda, Worli Branch
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे. असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे- रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर-
mahacpim@gmail.com
आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता.
Jeevan Marg
A/C Number- 04220100009541
IFSC CODE- BARBOWRLIX
Bank of Baroda, Worli Branch
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments
Post a Comment