बंगालमध्ये दडपशाहीचा नंगानाच! लोकशाहीची हत्या!


२२ मे रोजी कोलकात्याचे रस्ते  शेतकरी- शेतमजूरांच्या रक्ताने माखून गेले! पोलिसांचा असा पाशवी लाठीहल्ला, अश्रूधुराचा मारा आणि वॉटर कॅननचा फवारा बंगालने गेल्या अनेक दशकांत पाहिला नव्हता! या अमानुष हल्ल्यातून आबालवृद्ध आणि महिलांनाही पोलिसांनी सोडले नाही! हजारो लोक जखमी झाले, शेकडोंची डोकी फुटली, अनेकांची हाडे मोडली, काहीजणांचे तर डोळेच गेले! या निर्घृण दल्ल्याचे सूत्रधार होते ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे रानटी सरकार!

या हल्लाग्रस्तांचा गुन्हा काय होता? तर त्या दिवशी सकाळी बंगालच्या सर्व जिल्ह्यांच्या खेड्यापाड्यांतून अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियन व अन्य ९ डाव्या किसान- शेतमजूर संघटनांच्या हाकेला प्रतिसाद देऊन ३ लाखाहून अधिक शेतकरी- शेतमजूर न्याय मागण्यासाठी कोलकात्यात शांततेने जमलेले होते. पश्चिम बंगालच्या डाव्या आघाडीने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. शहरातील ५ ठिकाणी जमून हे लाखो लोक 'नबान्ना' या बंगालच्या मंत्रालयावर पाच दिशांनी शांततापूर्ण मोर्चे काढून तेथे एकत्र जमणार होते आणि राज्य सरकारला आपल्या १८ ज्वलंत मागण्यांचे निवेदन सादर करणार होते. 

'बांगला बिपन्ना! चलो नबान्ना!' ही त्यांची घोषणा गेला महिनाभर बंगालमध्ये घुमत होती. तृणमूल सरकारच्या राज्यात ग्रामीण व शहरी श्रमिक खरोखरच विपन्नावस्थेत ढकलले गेले होते. डाव्या आघाडीच्या सरकारच्या ३४ वर्षांच्या कार्यकाळात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या कधीच झाल्या नव्हत्या, त्यांची तृणमूल काँग्रेसच्या अखत्यारीत गेल्या ६ वर्षांत सुरवात झाली आणि त्या वाढतच गेल्या. ही दारूण वास्तवता झाकण्यासाठी ममता सरकारने धादांत खोटेपणाचा कळस गाठला. देशातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती जमा करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण मंडळाला ममता सरकारने सरळ ठोकून दिले की, बंगालमध्ये गेली काही वर्षे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झालेलीच नाही!

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींप्रमाणे शेतीमालाला रास्त भाव, शेतकरी- शेतमजूरांना कर्जमाफी, मनरेगाखाली मागेल त्याला काम, वृद्ध शेतकरी-शेतमजूरांना मासिक पेन्शन, पेट्रोल, डिझेल, गॅस व केरोसीनच्या दरात कपात, घरांसाठी जमीन व घरकुले, आदिवासींना विशेष आर्थिक सहाय्य, सर्वंकष पीक विमा योजना, विजेची कनेक्शन्स, स्वस्त दरात कर्ज, अन्नसुरक्षा, जातीय सलोख्याचे रक्षण, महिलांवरील वाढत्या अत्याचारांना पायबंद आणि जनतेच्या लोकशाही अधिकारांचे रक्षण अशा अत्यंत रास्त व जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी हे ग्रामीण गरीब बंगालच्या कानाकोपऱ्यातून कोलकात्यात आले होते.

या मागण्यांना आडकाठी घालण्यात मोदी-प्रणित भाजपचे केंद्र सरकार आणि ममता-प्रणित तृणमूलचे राज्य सरकार हे दोघेही जबाबदार आहेत ही कोलकात्यात जमलेल्या लोकांची ठाम धारणा होती, आणि ती धारणा ते गगनभेदी घोषणांतून व्यक्त करत होते. लाल झेंडे, लाल फलक, लाल पताका यांनी कोलकाता शहर लालेलाल झाले. आणि नेमके तेच लोकशाहीच्या मारेकरी असलेल्या ममता बॅनर्जींना आणि तृणमूल सरकारला सहन झाले नाही. आपल्याच राज्यातील जनतेचे निवेदन स्वीकारण्याचे, त्यावर चर्चा करण्याचे साधे सौजन्यही ममतांनी दाखवले नाही. उलट आधल्या दिवशीच त्या कोलकाता सोडून दुसऱ्या जिल्ह्यात पळून गेल्या- पण आंदोलकांवर रानटी दडपशाही करण्याचे आदेश पोलिसांना देऊन!

या अभूतपूर्व आंदोलनाचे नेतृत्व सूर्यकांत मिश्रा, बिमान बोस, हन्नन मोल्ला, मोहम्मद सलीम, मदन घोष, रेखा गोस्वामी, मिनोती घोष, अंजू कार, रामचंद्र डोम, शमिक लाहिरी, सुतन चक्रवर्ती, कांती गांगुली, नृपेन चौधरी, अमल हलदर, अमिया पात्रा, तुषार घोष अशा अनेक नेत्यांनी आघाडीवर राहून केले. त्यांपैकी अनेकांवर लाठीमार झाला, अनेकांना अटक झाली. 

या आंदोलनात पुरुष पोलिसांनी सर्व कायदे तोडून महिला आंदोलकांवर पाशवी लाठीहल्ला केला, अत्याचारही केले. लोक प्रचंड संख्येने जेथे जमले त्या परिसराभोवती बॅरिकेड टाकून जमाव त्यातूनबाहेर पडणार नाही याची निश्चिती करून पोलिसांनी अमानुष लाठीमार सुरु केला. त्यातून जालियनवाला बागेची आठवण अनेकांना झाल्याशिवाय राहिली नाही. अनेक पत्रकारांवरही हल्ला झाला आणि त्यांचे कॅमेरे पेलिसांनी फोडून टाकले. 

या पाशवी दडपशाहीचा आणि लोकशाहीच्या हत्येचा जळजळीत निषेध करण्यासाठी बंगालच्या कानाकोपऱ्यांतील लाखो लोक त्याच दिवशी सायंकाळी आणि दुसऱ्या दिवशी रस्त्यावर आले आणि हा लढा जास्त तीव्र करण्याचा त्यांनी निर्धार केला. हे जनविरोधी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले ममता सरकार आणि मोदी सरकार हटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिज्ञा लाखो लोकांनी बंगालमध्ये केली. महाराष्ट्रातही बंगालमधील या पाशवी दडपशाहीच्या निषेधाचा श्रमिक जनतेचा आवाज आपण सर्वत्र घुमवला पाहिजे. 



वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे. असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे- रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर- 

     mahacpim@gmail.com 

आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता.

     Jeevan Marg 
     A/C Number- 04220100009541
     IFSC CODE- BARBOWRLIX
     Bank of Baroda, Worli Branch
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

जनावरांच्या विक्रीवरील बंदीचा आदेश मागे घ्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी (१) - सी. पी. भांबरी

मोदी सरकार : शेतकऱ्यांशी केलेल्या गद्दारीची तीन वर्षे!