राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी (३) सी. पी. भांबरी
१६ जुलै २०१६ रोजी कानपूर येथे रास्वसंघाच्या
कार्यकर्त्यांच्या सभेत सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते, “नरेंद्र
मोदी हा आपला माणूस आहे. चांगले काम करीत आहे. रास्वसंघाची पार्श्वभूमी असलेले व संघाशी निगडीत असलेले
पंतप्रधानपदावरील मोदीच नव्हे तर रास्वसंघाचे अनेक कार्यकर्ते आज मंत्रीपदावर
विराजमान असून मोदींबरोबर तेही अगदी झटून काम करीत आहेत.”
‘आपल्या उद्दीष्टानुसार
पाठ्यपुस्तकांच्या पुनर्लेखनाचे कामही मोदी सरकार तडीस नेईल.’ असेही आश्वासन
भागवतांनी रास्वसंघाच्या कार्यकर्त्यांना दिले. केवळ केंद्रातील मोदी शासनातच रास्वसंघाच्या
कार्यकर्त्यांचा भरणा आहे असे नसून संघीय किंवा संघाने मान्यता दिलेले अत्यंत
विश्वासू व जबाबदार कार्यकर्ते आता अनेक राज्यांमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री
म्हणून कामकाज पाहत आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भाजपची सरकारे या रास्वसंघाच्या
विस्तारित शाखा असून या केंद्र व राज्यांमधील सरकारे संपूर्णपणे रास्वसंघाच्या नियंत्रणात
व मार्गदर्शनाखाली कारभार करीत आहेत. ‘रास्वसंघ घोषित हिंदुत्वाच्या व्याख्यात बसणारे भारतीय
समाजाचे ‘हिंदूकरण’ करण्याची कामगिरी पार पाडणे’ हे त्यांचे पहिल्या क्रमांकाचे उद्दीष्ट
आहे. रास्वसंघाचे समर्पित कार्यकर्ते भाजपच्या नियंत्रणाखालील सरकारात आहेत,
एवढ्यावरच रास्वसंघ समाधानी नाही.
शासन व रास्वसंघात दुवा साधण्यासाठी त्याने
रास्वसंघाच्या श्रेणीतील उच्च पातळीवरील स्वत:चे विश्वासू कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. हे कार्यकर्ते केंद्र व
राज्यांमधील भाजप सरकारांच्या दैनंदिन कार्यक्रमांवर लक्ष ठेवून, रास्वसंघाने ठरवून दिलेल्या मुख्य कार्याची अंमलबजावणी
ते ते सरकार काटेकोरपणे करते किंवा नाही यावर जागता पहारा ठेवून आहेत. ह्याचाच
अर्थ भाजप सरकार केंद्रात असो की राज्यात, त्यांना स्वायत्तता नाही. रास्वसंघाच्या
इशाऱ्याबरहुकूम त्यांना चालायचे आहे. थोडक्यात भाजप रास्वसंघाच्या हातातले बाहुले
असून रास्वसंघाचा आता राजकारणात निरंकुश प्रवेश झालेला आहे. रास्वसंघ व भाजप
यांच्यामधील नात्याचे हे (कडवट) सत्य आहे. कारण भाजपसहित चव्वेचाळीस
(हिंदुत्ववादी) भातृसंघटनांची पालकसंघटना एकमेव रास्वसंघच हाच आहे.
निर्विवाद व संपूर्ण बहुमत हस्तगत करून भाजप भारतीय
संसदेत स्थानापन्न झाल्यापासून पुढे रास्वसंघ व भाजपचा संघटनात्मक पातळीवर
झपाट्याने विस्तार झाला, हेही आपण पाहतो आहोत. त्याच्या विजयाच्या अगदी
प्रारंभकाळात म्हणजे २०१२ ते २०१४ या दोन वर्षांत रास्वसंघाच्या शाखांमध्ये भरघोस
म्हणजे १०,४१३ ने वाढ झाली. २०१५ साली त्यात आणखी ५५२४ शाखांची भर पडली. २०१४-१६
या कालावधीत शाखांची एकूण संख्या झाली ५६,८३९. स्वयंसेवक भरतीचे रास्वसंघाचे काम
झपाट्याने सुरु असतानाच भाजपचा विस्तार कार्यक्रम तितक्याच जोरावर आहे. अमित
शहांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत सादर केलेल्या अहवालानुसार ७,२५,००० भाजप
कार्यकर्ते प्रशिक्षित झाले असून १२,२५,००० कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची
योजना आखलेली आहे. कार्यकारिणीत बोलताना अमित शहा म्हणाले, “२०१६
अखेर एकूण एक ५७८ जिल्ह्यांमध्ये पक्ष कार्यालये बांधण्याची योजना आहे. त्यातील
१७० जिल्ह्यांमध्ये भाजपची कार्यालये अस्तित्वात आहेतच. अन्य १७८ जिल्ह्यांमध्ये
कार्यालयांची जागा खरेदी झालेली आहे व प्रत्येक राज्य, जिल्हा व पंचक्रोशीत
पक्षाची उपस्थिती दिसलीच पाहिजे” असेही त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
नरेंद्र
मोदींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला आणि- ‘बाराशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या भारतात लोक आता प्रथमच
स्वातंत्र्याची अनुभूती घेत आहेत.’ असा प्रचार सुरु झाला. – भारतावर दोनशे वर्ष
राज्य करणाऱ्या ब्रिटिशांबाबत हे विधान नव्हते, तर भारतीय उपखंडातील मुस्लीम
राज्यकर्त्यांच्या प्रदीर्घ इतिहासाकडे आडपडद्याने केलेला हा निर्देश होता. ‘मुस्लीम
राजवटीने अपनास्पद गुलामगिरीत हिंदूंना जखडून ठेवले होते,’ असा रास्वसंघकृत इतिहासाचा दावा आहे. हिंदूंच्या भारतमातेत
जे अहिंदू ते ते उपरे! त्यांना ‘लक्ष’ करणे,
मुस्लीम-ख्रिश्चन, धार्मिक अल्पसंख्यक समाजाच्या धर्म
संस्कृतीविरुद्ध युद्ध पुकारणे हे रास्वसंघाचे जीवितध्येय
भाजपला साकार करायचे आहे, हा अन्वयार्थ लक्षात घेतला पाहिजे.
२०१४च्या प्रारंभी धार्मिक अल्पसंख्यांकांच्या धार्मिक
प्रथा-परंपरा-प्रतिके यांच्याविरुद्ध रास्वसंघप्रणित सरकारांनी जणू युद्धच
पुकारले. ‘मुस्लीम चामड्याच्या उद्योगाखतर व गोमांस खाण्यासाठी गायींची हत्या
करतो’, असा
संशय घेऊन त्यांच्यापासून गायींना वाचविण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व रास्वसंघाच्या अन्य भातृभावी संघटनांनी मोठी हिंसक मोहीम
उघडली. हा रास्वसंघाच्या वाटचालीचा हेतू स्पष्ट करणारा केवढा मोठा पुरावा आहे!
दिल्लीजवळच्या
दादरीमधून या हिंसक मोहिमेचा नारळ फुटला. ‘अमूक एका माणसाने (अखलाख) गायीची
हत्या करून तिचे मांसही खाल्ले’ असे एका झुंडीने ठरवले. त्याची चर्चा हवेत सोडून
दिली. अफवेचा हा-हा म्हणता वणवा झाला. त्यात निष्पाप अखलाख जिवानिशी गेला. त्याची
निर्घृण हत्या करण्यात आली. स्वयंघोषित गोरक्षकांनी संशयित गोमांसभक्षक लक्ष्य
करण्याची ती पहिली घटना... आज राजरोसपणे हल्ले सुरूच आहेत. पिसाट गोरक्षक आता
हाताबाहेर गेले आहेत. खरं तर संघ परिवाराच्या या दुष्ट व आडदांड मोहिमेने भारतातील
जनमानस कलुषित करून टाकले आहे. संशयावरून निष्पाप मुस्लिमांची हत्या करणाऱ्या
संघीय दक्षता पथकांना भाजप सरकारांच्या पंखाखाली पुरेपूर संरक्षण लाभले आहे.
दादरीच्या निष्पाप अखलाखच्या हत्येसंदर्भात साधी प्रतिक्रिया देण्याचे कष्टही भाजप
नेत्यांनी घेतले नाहीत, हे सत्यही खूप बोलके आहे.
गुजरातमध्ये
उना तालुक्यात ११ जुलै २०१६ रोजी गोरक्षक गटाने दलित तरुणांना मारहाण केली. ते
तरूण मृत गायीचं चामडं काढीत होते व तोच त्यांचा व्यवसायही आहे. या घटनेनंतर रास्वसंघ व भाजपवर उत्तर देण्याची पाळी आली तरीही
स्वयंघोषित गोरक्षकांनी सबंध देशभर मारहाणीचे सत्र सुरू केले. महाराष्ट्र, गुजरात,
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हरियाणा तसेच राजस्थानात या प्रकारास विरोध झाला नाही.
कारण या राज्यांमधील भाजप सरकार व रास्वसंघाचे या अत्याचारांस पूर्ण समर्थन लाभले
होते. असे असले तरीही संपूर्ण गुजरातमध्ये दलितांनी गोरक्षकांविरुद्ध जोरदार उठाव
केला.
दलितांना होत असलेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून संबंधित
भाजप सरकारांना नमते घ्यावेच लागले. नरेंद्र मोदींना देखील गंभीर वस्तुस्थितीची
दखल घेणे भाग पडले. उना प्रकरणी जर ते गप्प बसले असते तर दलितांना भाजपकडे आकर्षित
करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली असती. इतके असूनही मोदींचा दुटप्पीपणा लपून
राहिलेला नाही. दलितांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष करावे तर निवडणुकांसह राजकीय
लाभांचे गणित चुकते, दुसरीकडे गोमांसभक्षक मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या रास्वसंघाच्या
मोहिमेलाही विरोध करता येत नाही. परिणामत: त्यांच्या स्वत:च्याच राज्यात- म्हणजे गुजरातेत जेव्हा
दक्ष-गोरक्ष गटाने दलितांवर हल्ले केले तेव्हा त्या त्या गटाविरुद्ध मोदींनी
नाइलाजाने तोंड उघडले. गोहत्येचे आरोप शिजवून मुस्लिमांना लक्ष्य करण्याचे
कारस्थान थांबविण्यासाठी कोणीही पाऊल उचलायला तयार नाही.
हरियाणाच्या
मेवातमध्ये कुर्बानीचा सण असलेल्या ‘बकरी ईद’च्या
काळातच हरियाणा पोलिसांनी बिर्याणी विक्रेत्या मुस्लीम दुकानदारांची तपासणी मोहीम
सुरू केली. ७ सप्टेंबर २०१६ रोजी हरियाणा पोलिसांनी मुस्लीमबहुल भागात बिर्याणीचे
नमुने गोळा करण्याचे काम हाती घेतले. त्याच्याच बरोबरीने मुस्लिमांमध्ये दहशत
निर्माण केल्यामुळे बिर्याणीचा व्यवसायच पार धुळीला मिळाला. बिर्याणी विक्रीसाठी
गोहत्या केली का? हे
तपासण्यासाठी दुकांनाबरोबरच मुसलमानांच्या घरांवरही धाडी टाकण्यात आल्या. हरियाणाच्या
पोलीस उपमहासंचालकांच्या देखरेखीखाली पोलीस अधिक्षक (एसपी) व ‘पोलीस
गोरक्षक कार्यबल’ यांनी संयुक्तपणे त्यांच्या वस्त्या पिंजून काढल्या. यासंदर्भात
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना १७ सप्टेंबर २०१६ रोजीच्या पत्रकार
परिषदेत विचारलेला प्रश्न त्यांनी किरकोळ बाब म्हणून फेटाळून लावला.
बकरी
ईदच्या कुर्बानी दिवसाविरुद्ध, मुस्लीम धर्म व संस्कृतीविरुद्ध रास्वसंघाने मोठे युद्धच आरंभल्यामुळे मुस्लीम बांधवांनी
तो सण प्रचंड दहशतीखाली कसाबसा साजरा केला. सेमी-कर्फ्यू असावा
अशी स्थिती होती १३ सप्टेंबर रोजी. त्याच दिवशी काश्मीरात कर्फ्यू जारी केल्यामुळे
मुस्लिमांना सण साजरा करता आला नाही. जम्मू-काश्मीरमधील पीडीपीचे ज्येष्ठ नेते
तारिक कार यांनी १५ सप्टेंबर २०१६ रोजी पीडीपी व लोकसभेचा राजीनामा दिला. त्यावेळी
ते म्हणाले, “काश्मिरी जनतेच्या प्रार्थनेलाही मज्जाव होत असेल तर आता निर्णय
घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.” काही प्रार्थनास्थळे व मोठमोठ्या मशिदींनासुद्धा
टाळी ठोकण्यात आली होती.
या
सगळ्या घडामोडी आपल्याला काय सांगत आहेत? अल्पसंख्यक मुस्लीम समाजावर रास्वसंघ आपला हिंदू संस्कृतीचा कार्यक्रम यशस्वीरित्या
लादीत आहे. ह्यांत आता काही शंका उरलीय का? रास्वसंघ व भाजप सरकारांच्या राज्यांमध्ये मुस्लिमांना
अवमानित करण्यासाठी लव्ह-जिहाद, धर्मांतर तसेच गोहत्येचे निमित्त करून होणारे
शारीरिक हल्ले हे कोणत्या धोरणाचे निदर्शक आहे?
या सर्व
घटना आपल्याला सांगत आहेत की, रास्वसंघ ही घटनाबाह्य
सत्ताकेंद्र बनली आहे. देशभरातील शासनसंस्था रास्वसंघाच्या विचारसरणीचा अजेंडा
राबविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या व्यक्तींच्या नियंत्रणात व
प्रभावाखाली काम करीत आहेत. समाजाचे ‘हिंदूकरण’ हा
अतिमहत्वाचा कार्यक्रम राबवताना पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन व तरुणांच्यात
बुद्धीभेद करण्याचे काम रास्वसंघ पार
पाडीत आहे. धार्मिक अल्पसंख्यांकांनी भावी हिंदू राष्ट्रात त्यांचे दुय्यम
नागरिकत्व गुपचुप स्विकारावे ह्याकरिता त्यांच्यावर हिंसक हल्ले केले जात आहेत.
त्यांच्यावर बळजबरी करून त्यांना आपल्या हुकूमात जखडबंद केले जात आहे.
(पूर्ण)
(अनुवाद: हिरा जनार्दन)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष
(मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे.
असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे-
रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर-
mahacpim@gmail.com
आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता-
Jeevan
Marg
A/C Number- 04220100009541
IFSC CODE- BARBOWRLIX
Bank of Baroda, Worli Branch
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments
Post a Comment