शेतकरी आंदोलन ... त्या रात्री काय घडले...! - डॉ अजित नवले


डॉ अजित नवले, समन्वयक, शेतकरी संघटनांची समन्वय समिती 

प्रिय मित्रांनो !

👉शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 2 जून रोजीचा संप फोडणाऱ्या काही जणांनी वाहिन्यांवर उलटसुलट चर्चा करून सद्या सुरु असलेले आंदोलन विस्कटवून टाकण्याचे प्रयत्न नव्याने सुरु केले आहेत.

👉 वृत्त वाहिन्यांनी शेतकरी संपाचे व आंदोलनाचे आजवर जे वृत्तांकन केले त्यामुळे शेतकरी आंदोलनाला मदतच झाली आहे हे नम्रपणे मान्य केले पाहिजे.

👉संप फोडणारे जी बकबक करत आहे त्याची उत्तरे देणे आवश्यक झाले आहे. शेतकरी आंदोलन पुढे जावे व शेतकरी संघटनांची एकजूट अधिक मजबूत व्हावी यासाठी सर्वांपर्यंत हे मुद्दे व सत्य पोहचविणे गरजेचे आहे. 

👉संप फोडण्याचा प्रयत्न झाला त्या रात्री ‘वर्षावर’ काय झाले हे ही आता कोणताही मुलाहिजा न ठेवता मी मांडणे आवश्यक झाले आहे. ‘वर्षावर’ त्या रात्री काय झाले या विषयावर चर्चा केंद्रित करण्याचे आजवर मी टाळले होते. 

👉चर्चा शेतकरी आंदोलन व शेतकरी प्रश्नांवर केंद्रित रहावी व वर्षावर माझ्या बरोबर त्या रात्री जे तथाकथित शेतकरी नेते होते त्यांची अधिक बदनामी होऊ नये म्हणून मी या विषयावर सविस्तर बोलणे टाळत होतो. 

👉काही वाहिन्यांवरील कार्यक्रमामुळे मात्र मला अधिक बोलणे भाग आहे.

👉चर्चेत असे सिद्ध करण्याचा ठरवून प्रयत्न सुरु आहे की, वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेत शेतक-यांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या होत्या तरी मी राजू शेट्टी यांच्या सांगण्या वरून संप पुढे सुरु ठेवण्यासाठी बैठकीतून बाहेर पडलो. 

👉असेही पटवून देण्याचा प्रयत्न झाला की त्या रात्री मी राजू शेट्टी यांच्या संपर्कात होतो.  सदरचा दावा केवळ हास्यास्पदच नसून असे मांडणारांच्या अकलेची दिवाळखोरी सिद्द करणारा आहे. 

👉दोन्ही मुद्यावर आपण बोलूयात.

👉 वर्षावर अगोदरच्या कोअर कमिटीने दिनांक २ जून रोजी मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या चर्चेत शेतक-यांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या होत्या असा दावा तथाकथित नेते वाहिन्यांवरील चर्चेत करत होते. वास्तव काय होते ..? 

1. मागण्या मान्य झाल्या होत्या तरी त्यानंतर झालेल्या आंदोलनात हजारो शेतकरी का उतरले .....?

2. महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त  पाठींबा का मिळाला ...?

3. मंत्रिगटाची स्थापना का करावी लागली ...?

4. दहा हजाराच्या कर्जाच्या निमित्ताने अत्यंत जाचक अटी शेतक-यांवर लादण्याचा प्रयत्न का झाला...?

5. अल्पभूधारक व अधिक जमीन धारक असा फरक करून केवळ अल्पभूधारकांना कर्ज माफी देत इतरांना वंचित ठेवण्याचा प्रस्ताव का मांडण्यात आला...?

6. थकीत व बिगर थकीत असा भेद करून नियमित कर्ज भरणारांना, नवे जुने करणारांना व कर्ज पुनर्गठन करणारांना वंचित ठेवण्याचा डाव का खेळला गेला...?

7. केवळ ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्यांनाच कर्ज माफी देऊन त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत कर्जदार असलेल्या गरजू व संकटग्रस्त शेतक-यांना वा-यावर का सोडण्यात आले...?

8. पिक कर्ज ऐवजी सायफन, पॉलीहाउस, शेती औजारे आदींसाठी कर्ज घेतलेल्या गरजू व संकटग्रस्त शेतक-यांना दिलासा देणे का नाकारण्यात आले..?

9. नियमित कर्ज  भरणारांना वा-यावर का सोडण्यात आले...?

10. कर्जमाफीसाठी एक लाखाची मर्यादा लादून अधिक कर्ज असणा-या गरजू व संकटग्रस्त शेतक-यांना आत्महत्या करायला सोडून का देण्यात येत आहे...?

👉असे अनेक प्रश्न आहेत. उत्तर एकाच आहे. ‘वर्षा’ बंगल्यावरील दिनांक २ जून ची चर्चा मॅनेजड् होती. दोन नेते फुटीर होते. बाकीच्यांना दाबण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी संप फोडण्यासाठी मोठा डाव टाकला होता. कोणतीही मागणी मान्य झालेली नसताना संप मागे घेण्याचे ठरविण्यात आले होते.

👉आपला हा डाव उधळण्यात आला याचे अतीव दुख: मुख्यमंत्र्यांना व बैठकीतील मॅनेजड् दोन तथाकथित शेतकरी नेत्यांना होते . काही वाहिन्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या या दुखा:वर मलम लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र संप फोडल्याची शेतक-यांच्या मनातील जखम अजूनही भळभळते आहे. कर्जमुक्तीच्या गुलालानेच तिचा उपचार केला जाईल.

💥२ जूनचा घटनाक्रम .....

👉 मुख्यमंत्र्यांनी चर्चेनंतर सरकार शेतक-यांच्या कर्जमाफीला ‘अनुकूल’ आहे अशी घोषणा केली. चर्चेत हे नेते सांगत होते की मुख्यमंत्र्यांची ही घोषणा म्हणजे संपाचे अभूतपूर्व फलित आहे.
👉 एक नेता चर्चेत मुख्यमंत्र्यांसमोर सांगत होता की, ‘संप नावाच्या खेळण्यास मी चावी दिली आहे. हे खेळणे किती चालणार हे मला माहित आहे. नाही तरी हे खेळणे उद्या बंदच पडणार आहेत. शेतकरी स्वतःच संप मागे घेणार आहे. तेंव्हा आपणच आज संप मिटवून क्रेडीट पदरात पाडून घेऊयात.’

👉 मी प्रश्न उपस्थित करत होतो की कर्जमाफीला अनुकूल असण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेत नवीन काहीच नाही. शेतकरी ठोस आश्वासनाची अपेक्षा करीत आहेत. या घोषणेने कोणतेच रिलीफ मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी काही ठोस आश्वासन द्यावे. कर्ज कोणाचे माफ करणार ? किती करणार ? असे काही ठोस सांगावे. मुख्यमंत्री या बाबत काहीच बोलत नव्हेत व शिष्टमंडळातील दोन जणांना संप मिटविण्याची व प्रसार माध्यमांसमोर जाण्याची इतकी घाई झाली होती की मुख्यमंत्र्यांनी काही ठोस सांगण्याची त्यांना गरजच वाटत नव्हती. 

👉 ‘मुख्यमंत्री कर्जमाफीला अनुकूल’ असे सांगणे म्हणजे शेतक-यांच्या ८० टक्के मागण्या मान्य होणे आहे काय हा खरा प्रश्न आहे.

👉 शिष्टमंडळातील काही मित्रांची ‘वर्षा’ वरील बैठकीपूर्वी सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यावर चर्चा  झाली होती. संप मागे घ्यायचा निर्णय तेथेच झाला होता हे चर्चेच्या स्वरूपा वरून स्पष्टपणे दिसत होते. मागण्या मान्य न होताच  संप मागे घेऊ नका, शेतक-यांचा हा विश्वासघात होईल असे मी सर्वांना वारंवार सांगत होतो. 

👉 संपाशी गद्दारी होत असल्याने मी अत्यंत अस्वस्थ झालो होतो. माझे मत कोअर कमिटीच्या सदस्यांना सांगण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत होतो. मुख्यमंत्र्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी मला इतरांपासून तोडण्याचा व एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरु केला. मला इतरांशी बोलता येईनासे झाले. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आपण सर्व शेजारच्या रूम मध्ये बसू असा प्रस्ताव मी ठेवला. कोअर कमिटीच्या  काही  सदस्यांना घेऊन आम्ही शेजारच्या रूम मध्ये गेलो. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची चिटकवून बसलेले तथाकथित ‘नेते’ आमच्या सोबत आले नाहीत. शेजारच्या रूम मध्ये आलेल्या सदस्यांना मी पुन्हा मुख्यमंत्र्यांचा डाव समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याने संप मागे घेऊ नका’ असे मी त्यांना पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काही सदस्य माझ्याशी सहमत झाल्यासारखे वाटले. आम्ही पुन्हा बैठकीत येऊन बसलो.


👉 आम्ही बैठकीत येताच मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची शेजारी बसलेल्या तथाकथित नेत्याने संप मागे घेतल्याचे  जाहीर केले. मी पुरता हतबल झालो होतो. शेतकरी आपल्याला माफ करणार नाहीत. शेतक-यांशी हा मोठा विश्वासघात आहे असे मी वारंवार सांगून पाहिले. मात्र सर्व अगोदरच ठरले असल्याने माझ्या सांगण्याचा काहीच उपयोग झाला नाही.

👉 मी पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करण्याचे ठरविले. संप मागे घ्यायचा तर घ्या पण किमान ज्या गावाने संपाची सुरवात केली त्या पुणतांबे गावाला तरी विश्वासात घ्या अशी विनंती मी सर्वांना केली. आपण सर्व उद्या पुणतांबे गावात जाऊ. ग्रामसभा घेऊ. आपल्याला संपात मदत केलेल्या सर्वांना विश्वासात घेऊ. मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव ग्रामसभेत  मांडू व त्यात संपाबाबत निर्णय घेऊ अशी आग्रहाची विनंती मी करून पाहिली.

👉 माझी ही विनंती ऐकताच मुख्यमंत्री अक्षरशः भडकले. आपल्या ‘किया कराया’ वर हा माणूस पाणी फिरवतोय अशीच त्यांची भावना झाली असणार. शिष्टमंडळातील अनेकांना माझा हा प्रस्ताव मान्य होता. मात्र त्यांना दडपण्यात आले. दबाव आणण्यात आला.

👉 अस्वस्त होऊन मी बैठकीच्या रूम मधून बाहेर आलो. बैठकीत बसू नये, ही मॅनेजड् चर्चा आहे असे माझे मन मला सांगत होते. पण दुस-या बाजूला ज्यांच्या बरोबर चार पावले चाललो त्यांना सोडून जाणेही मनाला पटत नव्हते. माझी तगमग झाली होती. अखेर मी पुन्हा आत आलो. शांताराम कुंजीर यांच्या शेजारी बसलो. त्यांना व कानवडे यांना पुन्हा बोललो. धनंजय जाधव माझ्या पासून दूर होते. त्यांना शेवटचा प्रयत्न म्हणून मेसेज पाठविला. 

👉 मेसेज मध्ये मी त्यांना सांगितले... “ अनुभवाच्या आधारे सांगतो, संप मागे घेणे चुकीचे आहे. अगदी मागे घ्यायचाच असेल तर आपण पुंणतांब्याला जाऊ ग्रामसभा घेऊ त्यात ठरवु.”

👉 मेसेजचा परिणाम  झाला व धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना तसे सांगून पाहण्याचा प्रयत्न केला. उपयोग मात्र झाला नाही. सगळे अगोदरच ठरलेले होते. अखेर प्रेसला बोलवा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

👉 होत असलेल्या पापात आता मला सामील होणे शक्य नव्हते. प्रेस समोर मीही या तडजोडीत सामील होतो असे होऊ देणे शक्य नव्हते. स्वतःशी व शेतक-यांशी प्रामाणिक राहण्याचा हा प्रश्न होता. अखेर शेजारी बसलेल्या सदस्यांना सांगून मी बाहेर पडलो.

👉 बाहेर पडताच किसान सभेचे केंद्रीय नेते डॉ. अशोक ढवळे यांना फोन करून मी सर्व प्रकार सांगितला व बैठकीत यापुढे बसणे शक्य नसल्याचे त्यांना सांगितले. एका शिस्तबद्धपणे काम करणा-या संघटनेचा मी कार्यकर्ता असल्याने पुढे काही कृती करण्यापूर्वी मी त्यांची परवानगी घेतली व वर्षाच्या बाहेर पडलो. बाहेर असलेल्या प्रेसला आतील मॅनेजड् चर्चेची माहिती दिली व महाराष्ट्रातील शेतक-यांना संप सुरु ठेवण्याचे आवाहन केले.

👉 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्यास प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांची तरुण पिढी अत्यंत त्वेषाने पुढे आली व संप सुरु राहिला.

👉 संपाला योग्य दिशा देणे आवश्यक होते. त्यासाठी आंदोलनांचा अनुभव असलेल्या नेत्यांना एकत्र करणे आवश्यक होते. विचारवंतांना बरोबर घेणे आवश्यक होते. आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलो. मी स्वतः रघुनाथ दादा पाटील, आ. बच्चू कडू आदींशी संपर्क सुरु केला. डॉ. अशोक ढवळे यांनी खा. राजू शेट्टी यांच्याशी संपर्क केला. खा.राजू शेट्टी  नुकतेच पदयात्रेतून घरी आले असल्याने त्यांना आरामाची आवश्यकता होती. बाकी नेत्यांच्या तारखाही व्यस्त होत्या. शेवटी सर्वांची तारीख जुळवून ८ जून रोजी बैठक घेण्याचा निर्णय घेतला. बैठकीचे आयोजन करण्याची जबाबदारी नाशिक येथील तरुण शेतक-यांनी घेतली. घेतलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण ताकतीने पार पाडली व संप सुरु राहिला.

👉 घटनाक्रम पाहता राजू शेट्टींनी संप हायजॅक करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला व त्यानंतर मी बैठकीतून बाहेर पडलो असे बिंबविण्याचा तथाकथित नेत्यांचा प्रयत्न पोरकट व हस्यास्पद आहे.

👉 संप पुढे सुरु राहिल्याने व सातव्या दिवशी संपाचे रुपांतर शेतकरी आंदोलनात झाल्याने अनेक मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या आहेत. शेतकरी संघटनांची एकजूट अद्यापही कायम असल्याने पुढेही आपण लढा सुरु ठेवणार आहोत. अनेक मागण्या मान्य करायला आपण सरकारला भाग पाडणार आहोत. 

👉 सुरु राहिलेल्या आंदोलनाने काय साध्य केले याबाबत मी स्वतंत्र लेख लिहिला आहे. अॅग्रोवन व सकाळ च्या सप्तरंग मध्ये तो प्रकाशित झाला आहे. अर्थात ज्यांना सत्य शोधायचे आहे त्यांनी तो जरूर वाचावा. केवळ उथळ चर्चा करणारांनी असे काही वाचण्याची आवश्यकता नसते.

👉संपाची संकल्पना स्पष्ट करणारा एक लेख मी 22 मे रोजी लिहिला होता. जमीन पडीक ठेवून संप करणे योग्य नाही, त्या ऐवजी शहरांना होणारा भाजीपाला व दुधाचा पुरवठा खंडित करून सरकारची कोंडी करावी असा लेखाचा आशय होता. आता हा लेख न वाचताच त्यावर ही मंडळी उलटसुलट चर्चा करीत आहे


👉 शेवटी इतकेच सांगतो की, लढा कमजोर करण्यासाठी अशी षड्यंत्रे  होत राहतील. शेतकरी संघटना व शेतकरी नेत्यांमध्ये भांडणे लावून शेतकरी चळवळ मोडीत काढण्याचे प्रयत्न होत राहतील. पण खात्रीपूर्वक सांगतो अशा प्रकारच्या सर्व संकटांचा आपण मिळून मुकाबला करू. खंबीरपणे मार्ग काढू. 

👉 नियत साफ असल्याने बिनबुडाच्या संकटांना चिरडून शेतकऱ्यांची युवा पिढी नक्कीच पुढे जाईल. माय बापाच्या दुःखाचं मूळ या तरुणांना नक्की कळले आहे. ते आता थांबणार नाहीत.


              डॉ. अजित नवले
सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा
समन्वयक, शेतकरी संघटनांची सुकाणू समिती

Comments