राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी (२) - सी. पी. भांबरी
राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाने आपली अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ११ ते १३ मार्च रोजी भरवली होती. या सभेत
संघाने पुन्हा एकदा ठासून म्हटले की, ‘आपल्या
प्राचीन सांस्कृतिक मूल्यांबाबत लोकजागृतीचे काम फक्त आपण म्हणजे रास्वसंघच करतो.’
वस्तुस्थिती अशी आहे की, रास्वसंघाची
सर्वोच्च फळी आपल्या चव्वेचाळीस सहसंघटनांचा आढावा नियमितपणे घेत असते. ज्यातील
भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या
प्रमुख संघटना असून झोकून देऊन काम करणाऱ्या, उच्चशिक्षित पूर्णवेळ
कार्यकर्त्यांचा फार मोठा जथा त्यांच्यापाशी आहे. रास्वसंघाच्या शाखांमधील
पाठशाळांमधून त्यांची जडणघडण झालेली आहे. त्यामुळे संघाने केलेल्या
राष्ट्रवादाच्या व्याख्येनुसार ‘हिंदू राष्ट्रवादी’ विचारसरणीची पेरणी करणे हे त्यांचे जीवितकार्य होऊन
बसले आहे. इतरही बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या अंगावर घेतलेल्या आहेत. ‘हिंदुत्ववाद, सनातन धर्मा’चा
संदेश भारतातील शहरं, गावं व दुर्गम भागांत पसरविण्यासाठी ते
झटत आहेत.
त्यांना
अखिल भारताला ‘सनातन धर्माचे आगर’ बनवायचे आहे. त्यासाठी औपचारिक रित्या स्थापन झालेल्या
शिक्षणसंस्था, देवळे, तसेच अनौपचारिक स्थानिक मंडळांमध्ये घुसून, त्याचा जोरदार
प्रचार ते करीत आहेत. शाळा-महाविद्यालयेच नव्हे तर सामान्य हिंदूंच्या घराघरात ते
पोहोचवायचे आहे. रास्वसंघाचे लोकचळवळीत रूपांतर करावयाचे आहे.
त्याचबरोबर त्यांनी हिंदू तरुणांना शारीरिक व निमलष्करी प्रशिक्षण देण्याचा धडाका
लावला आहे. हे प्रशिक्षण कशासाठी? तर
बिगर हिंदूंनी उभ्या केलेल्या (त्यांच्या मते) आव्हानांना शारीरिक पातळीवर
प्रतिकार करू शकतील असे हिंदू त्यांना घडवायचे आहेत. रास्वसंघाच्या ‘दुर्गावाहिनी’ नावाने चालविण्यात येणाऱ्या ‘महिला
शाखेत’ स्त्रियांनाही ‘आत्मसंरक्षणाचे’ प्रशिक्षण दिले जाते.
रास्वसंघाच्या शाखांमधून
दिले जाणारे लाठी-प्रशिक्षण आपण जाणतोच. लाठी काही साधीसुधी नसते. अगदी पक्की
मजबूत लाठी असते ती! ३० मे २०१६ रोजी बजरंग
दलाचे भौसिंग राणावत म्हणाले की, ‘मुस्लीम
पुरुष हिंदू स्त्रियांना छळत असतील तर त्यांना प्रतिकार कसा करावा? दहशतवादी
हल्ला झाल्यास आत्मसंरक्षण कसे करावे? गाईंची हत्या कशी रोखावी? याबाबत आपण जे जागृती व प्रशिक्षण अभियान चालवतो
त्याला ‘जातीयवाद’ कसे म्हणता येईल?’ हिंदू तरूणांना शारीरिक
दृष्ट्या
सक्षम करण्यासाठी शाखांवर चालणारे दैनंदिन
कार्यक्रम व रास्वसंघाची संसद (रचना) याबाबत त्यांनी आजतागायत कमालीची ‘गुप्तता’
पाळलेली आहे. त्यादृष्टीने पाहता अन्य लष्करी संघटनांच्या मानसिकतेशी हे
मिळतेजुळते आहे. परंतु तो काळ आता मागे पडला आहे. रास्वंसंघ आता
उघड्या मैदानात शाखा भरवतो. त्यांच्या शाखा, उपशाखा तसेच भातृसंघटनांमध्ये ते
जाहीरपणे सांगत आहेत की, ‘तरूण हिंदू
स्त्री-पुरुषांना आपल्या विरोधकांशी समर्थपणे दोन हात करता यावेत, यासाठी त्यांना शारीरिक
प्रशिक्षण द्यावेच लागेल. खास करून स्वसंरक्षणार्थ शस्त्रं कशी चालवायची याचे
शिक्षण त्यांना दिले पाहिजे.’
२७
जून रोजी बजरंग दलाचे बलराज डुंगर यांनी आपल्या भाषणात जाहीरपणे सांगितले की, ‘शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण हा भारतीय संस्कृतीचाच एक
भाग आहे. त्यासाठी आपण ठराविक काळाच्या अंतराने प्रशिक्षण शिबिरे भरवितो.’ २६ मे २०१६ रोजी विश्व
हिंदू परिषदेचे सचिव सुरेंद्र जैन म्हणाले, ‘शस्त्रास्त्रांचे
प्रशिक्षण हा आपल्या धोरणात्मक कार्यक्रमाचाच एक भाग आहे. अशी आत्मसंरक्षण शिबिरे
अयोध्येतही भरविण्यात आली होती.’
नोयडा
सेक्टर १२ येथे रास्वसंघ संचलित सरस्वती शिशू मंदिर नावाची शाळा
आहे. तेथील शेकडो विद्यार्थी बजरंग दलाच्या मार्गदर्शनाखाली सरपटणे, चऱ्हाटाच्या सहाय्याने
चढणे, अडथळे पार करणे, तलवारबाजी, कराटे, ननचाक (जपानी लष्करी शिक्षण प्रकार) इ.
प्रकार शिकत आहेत. त्यांच्या शिबिरांमधून ‘वंदे
मातरम’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या जातात. गोल टोपी परिधान केलेल्या मुस्लीम तरुणाशी तलवारीने
चाललेली लढत पडद्यावर दाखवली जाते. ‘हे
उघडउघड मुस्लीम विरुद्ध हिंदू चित्र दाखवून लष्करी प्रशिक्षणामागील मूळ हेतू
दोघांमध्ये वैराची भावना वाढवण्यासारखेच आहे!’
या आक्षेपाला उत्तर देताना बलराज डुंगर सफाई देतात की, ‘भारतातील
प्रत्येक गावात तालीम आहे. शस्त्रास्त्रे चालवायला शिकवणे हा गुन्हा होऊ शकत नाही.
किंबहुना नागरिकांना तशी परवानगीच देण्यात आलेली आहे.’
बी.एस.
मुंजे हे केशव बळीराम हेडगेवारांचे अत्यंत निकटचे सहकारी. इटलीचा हुकुमशहा
मुसोलिनी याला भेटून त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणारे मुंजे, मुसोलिनी व
त्याच्या हुकुमशाही पक्षातील युवकांना दिल्या जाणाऱ्या
लष्करी प्रशिक्षणाने खूपच प्रभावी झाले होते. रास्वसंघाची संघटनात्मक रचना त्याच प्रेरणेतून ‘बालिल्ला’च्या
(युवा लष्करी संघ) धर्तीवर करण्यात आली. जणू
बालिल्लाची प्रतिकृतीच! तसेच रास्वसंघाचा
राष्ट्रवाद हा नाझींच्या शुद्ध जर्मन राष्ट्रवादाचाच भारतीय अवतार आहे, असे
म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हिंदू राष्ट्रनिर्मिती किंवा हिंदू भारत-निर्माण
हे रास्वसंघाचे जीवितध्येय आहे. हिटलर
ज्याप्रमाणे जर्मनीला शुद्ध जर्मन रक्ताच्या नागरिकांचे महान राष्ट्र बनवू पाहत
होता, त्याच धर्तीवर रास्वसंघाला
हिंदू राष्ट्र निर्माण करावयाचे आहे.
वास्तविक
भारतीय समाजात धर्म-पंथ, जाती-उपजाती व त्यानुषंगाने विभिन्न संस्कृतिक परंपरांची
सरमिसळ झालेली असून हे भिन्न समाजगट चहुबाजूंनी हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेला
विरोध करीत असतात. तरीही रास्वसंघ मात्र आपले उद्दीष्ट गाठण्यासाठी कोणत्याही
थराला जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच तर भारतभर आज समाजा समाजात तंटे-बखेडे
सुरु झाल्याचे आपण पाहतो आहोत.
बहुविध संस्कृती हे
आपल्या देशाचे असाधारण असे वैशिष्ठ्य आहे. परंतु रास्वसंघाचे
जाळे आता देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले आहे व त्यांच्या विचारसरणीचा विचार
केल्यास भारत देशाला त्यापासून गंभीर धोका निर्माण झाला आहे. निधर्मी
(सर्वधर्मसमभावात्मक) लोकशाही व संघराज्यीय राज्यघटना भारतास लाभली हे मोठे भाग्यच
म्हणायला पाहिजे. अनेकविध संस्कृती जोपासणारे लोकसमूह व त्यांच्या जीवनसरणीची
वाताहात होऊ नये, ही या देशाची जबाबदारी आहे. परंतु लोकशाहीविरोधी, उतरंडीचे
(श्रेणीबद्ध) तत्व पाळणारा, धर्माधर्मात भेदभाव जोपासणारा, अल्पसंख्याक-संस्कृतीद्वेष्टा
रास्वसंघ वेगाने घोडदौड करीत आहे. अशावेळी राज्यघटनेच्या पायाभूत तत्वाच्या
समर्थकांना उदासीन राहणे, स्वस्थ बसणे परवडणार नाही. त्यांना
हे समतावादी तत्वज्ञान उचलून धरण्यासाठी पुढे यावे लागेल. रास्वसंघविरोधी लढाईत
उतरावेच लागेल.
v ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’
म्हणजे काय?
v त्याची मूलभूत विचारसरणी
v त्याच्या निधीचे (अर्थबलाचे) स्रोत
v रास्वसंघाचे
नेते व कार्यकर्ते यांच्यामधील संबंधांचे स्वरूप
v रास्वसंघामध्ये
असलेली समाजातील जातनिहाय प्रतिनिधीत्वाची स्थिती
v प्रादेशिकता
हा रास्वसंघाचा गाभा आहे का?
प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात
आपण रास्वसंघ व त्याच्या भातृसंघटनांच्या प्रदीर्घ इतिहासाची रूपरेषा पाहिली.
तेव्हाच आपल्या लक्षात आले की, ‘हिंसा
हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू आहे.’
आता आपण त्यांच्या अन्य पैलूंचा विचार करू. त्यांचे नेते व कार्यकर्ते यांच्यामधील
संबंध तपासून घेऊ. तरच डाव्या व लोकशाहीवादी शक्तींना
आपली व्यूहरचना आखणे शक्य होईल. पुन्हा एकदा कळीचा मुद्दा पुनरावृत्तीचा धोका
पत्करून सांगतो की, आपली लढाई ज्या संघाशी आहे, तो संघटित निमलष्करी हुकूमशाही व
श्रेणीबद्ध रचनेचा असून ‘हिंदू
राष्ट्रनिर्मिती’चे ध्येय गाठण्यासाठी काय
वाट्टेल ते करायला कटीबद्ध आहे. म्हणूनच त्याच्या तत्वविचार व राजकीय धोरणाशी
टक्कर घेणे ही लोकशाहीवादी सामाजिक व राजकीय शक्तींपुढील सर्वात मोठी कामगिरी
असणार आहे.
आज आपल्या देशातील विविध
स्तरांवरील सत्तास्थानी हिंदू राष्ट्र समर्थकांची प्रचंड घुसखोरी झाल्यामुळे
संपूर्ण राजकारणात मोठा गुणात्मक बदल घडून आला आहे. हे ह्याआधीच बोललो आहे. आज
भारताच्या पंतप्रधान पदावर बसलेले नरेंद्र दामोदर मोदी हे स्वत: रास्वसंघाचे कट्टर प्रचारक व विचारवंत असल्याचे आपण जाणतोच. संसदेच्या
कनिष्ठ सभागृहात (लोकसभेत) त्यांचा पक्ष बहुमतात आहे. त्या रास्वसंघाला समाजात
यथातथा स्थान होते. तो २०१४ पासून पुढे तीन वर्षात, जनजीवनाच्या मुख्य प्रवाहाला
येऊन भिडलेला आहे. देशात नव्याने उभारून आलेल्या राजकीय परिस्थितीचे नेमके गमक रास्वसंघाने
हेरले. प्राथमिक शाळा, विद्यापिठे, तंत्रनिकेतने, दृक-श्राव्य प्रसार-माध्यमे आणि
एकूणच सर्व स्तरांवरील शासकीय संस्थांमध्ये त्यांनी शिरकाव करून घेतला आहे. एकूणच
सर्व महत्वपूर्ण आस्थापनांच्या नाड्या हातात आल्यावर या ताज्या संधीचा पुरेपूर
फायदा घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न रास्वसंघ करीत आहे.
भारतीय समाजाचे ‘हिंदूकरण’
करण्यासाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. त्या दृष्टीने ब्राह्मणी कर्मकांडावर
बेतलेल्या हिंदू श्रद्धांच्या प्रचार-प्रदर्शनाला जबरदस्त वेग आला आहे. त्यासाठी संघियांनी भारतातल्या
शेकडो-हजारो देवळांमधील कैक पुजाऱ्यांना हाताशी धरले आहे. ‘सर्वात श्रेष्ठ धर्म- हिंदू धर्म, संस्कृतादी भाषा,
पवित्र गोमातेचे संरक्षणकरण्यातला प्रतिकात्मक धर्म, सूर्यनमस्कार व गायत्री मंत्र
पठणामागील (हिंदू) धार्मिकता देशाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय करायची आहे.’ त्यासाठी प्रचंड खटाटोप सुरु आहे. तसेही आदिवासी
भागात रास्वसंघाचे भरघोस काम आहे, नावही आहे. आता त्याचाच आधार घेऊन या सर्व
जमातींचे हिंदूकरण करण्याचे काम नव्या जोमाने चालले आहे. ‘आदिवासी जमाती या महाभारताच्या काळातही भारतातच
होत्या, मुळात हिंदूच होत्या. त्यांना सनातन धर्मात परत आणलेच पाहिजे.’ या बाबींचा ‘द
ऑर्गनायझर’ तसेच ‘रास्वसंघाच्या साप्ताहिका’ने पुन:पुन्हा उच्चार केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला आज अनेक
राज्य सरकारांसह केंद्र सरकारचे अभय व वरदान मिळाले आहे. त्या-त्या ठिकाणी त्यांचे
प्रभावक्षेत्र वाढत चालले आहे. हिंदू भारत व हिंदू हितसंबंध जपणे, त्यांचे संवर्धन
व संरक्षण करणे, व त्याच्या चिरस्थायी अशा मजबूत उभारणीचे कार्य सुरु आहे, यात
तिळमात्र शंका नाही. ‘आमचे
बिगर राजकीय सांस्कृतिक संघटन आहे’
असे सोंग करीत देशातील विभिन्न क्षेत्रातील संस्थांमध्ये संघाने शिरकाव केला.
तथाकथित सांस्कृतिक संदेश पसरविण्याचा धडाका लावला. परंतु आता त्यांचे बिंग फुटले
आहे. तोच त्यांचा पदराआड झाकलेला पण सुस्पष्ट राजकीय कार्यक्रम होता, ही बाब आता
लपून राहिली नाही.
(क्रमश:)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष
(मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे.
असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे-
रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर-
mahacpim@gmail.com
आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता-
Jeevan
Marg
A/C Number- 04220100009541
IFSC CODE- BARBOWRLIX
Bank of Baroda, Worli Branch
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी एक अभिमानी हिंदु आहे आणि हिंदुत्व व राष्ट्रवाद मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकण्याची गरज नाही. आधुनिक भारताच्या जडणघडणीत संघाचा असणारा वाटा अत्यंत बोलका आहे, 'राष्ट्रपित्याच्या हत्त्येने डागाळलेला संघ' असंच स्पष्ट सांगायचे झाले तर.
ReplyDeleteहिंसा हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू तर आहेच पण त्यांचा राष्ट्रवाद पण ढोंगी आहे.ब्राह्मणी वर्चस्वाखाली एकवटलेले ब्राह्मण्यवादी मनुवादी यांची हि संघटना देशभक्तीच्या गोष्टि सांगुन धर्मा धर्मात द्वेष पसरवून कुठले स्वप्न साकार करणार आहे म्हणे अखंड हिंदुराष्ट्र.