सहारनपूर-शब्बीरपूर येथील दलितांवरील हल्ला : भाजपचे धर्मांध राजकारण! - सुबोध मोरे


चमार चट्टा मुर्दाबाद,हर हर महादेव,जय श्रीराम,राणा प्रताप की जय,आंबेडकर मुर्दाबाद,देश में रहना है तो मोदी मोदी कहना है,परदेश (प्रदेश) में रहना है तो योगी योगी कहना है अशा घोषणांचा जयघोष करीत उत्तर प्रदेशामधील सहारनपूर जिल्ह्यातील शब्बीरपूर गावच्या दलितांच्या वस्तीवर आणि संत रोहिदास मंदिरावर हजारो ठाकूरांचा जमाव हातात नंग्या तलवारी, बंदूका, लोखंडी गज, पेट्रोल बॉम्ब, दांडके घेऊन नि:शस्त्र दलितांवर अंदाधुंदपणे हल्ला करीत होता. अनेक घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, ज्यात ६५ घरे जळाली. हल्लेखोरांनी काही घरे जाळण्यासाठी छोट्या सिलिंडरचाही वापर केला. या जाळपोळीत शाळकरी मुलांची पुस्तके-वह्या, घरातील धान्य व अन्य सामानांची राख झाली. घराबाहेर उभ्या असलेल्या सायकली, मोटारसायकलीही पेटविण्यात आल्या. आणि हे सर्व पोलिसांच्या उपस्थितीत घडत होते. व पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेऊन हल्लेखोरांना पाठिशी घालण्याचे काम करीत होते.
५ मे रोजी शब्बीरपूरच्या दलित वस्तीवर केलेल्या अमानुष हल्ल्याच्या वेळेस हल्लेखोर जातीय विद्वेषाने एवढे बेभान झाले होते की त्यांनी तेथील संत रोहिदास मंदिरात बसविण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व संत रोहिदासांच्या मूर्तींवर लघुशंका केली. तेथील अग्नीभास्कर या चबुतऱ्यावर आंबेडकरांची मूर्ती बसविणाऱ्या कारागिरावर तलवारीने वार केले व लोखंडी गजाने बेदम मारहाण करून त्याला धमकविण्यात आले कीराणा प्रताप की जय बोलो और आंबेडकर को भूल जाओ!’ जेव्हा त्याने त्यास नकार दिला तेव्हा सगळे हल्लेखोर त्याच्यावर तुटून पडले. त्यावेळेस त्याची पत्नी रिना आपल्या लहान बाळास दूध पाजत होती. तेव्हा तिच्याही पदराला हात घालण्याचे बेशरम कृत्य या शूर (?) ठाकूरांनी केले आणि जेव्हा तिने प्रतिकार केला तेव्हा तिच्यावरही या उन्मत्त हल्लेखोरांनी तलवारीने वार केले. ज्यात ती रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाली. तरीही त्यांनी तिच्या पाठीवर लोखंडी गजांनी बेदम मारहाण केली.
जवळपास २ हजारांपेक्षा अधिक लोकांचा उन्मत्त जमाव सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दलित वस्तीची नासधूस करीत होता. त्यांच्या हल्ल्यातून लहान मुले, वृद्ध आणि स्त्रियाही सुटल्या नाहीत. प्रत्येक घरातील कोणी ना कोणी जखमी झालेला आहे. जे घरात नव्हते किंवा जंगलात पळाले तेच वाचले. स्वत:ला गोभक्त, गोरक्षक म्हणविणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनीच्या या हिंदुत्ववादी गुंडांनी माणसांना तर मारलेच परंतु दलितांच्या गायी-म्हशींनाही तलवारीने मारले. बहुधा त्या दलितांच्या गायी म्हणजेदलित गायी हाच त्यांचा दोष असावा. या हल्लेखोरांचा रोख गावचा दलित सरपंच शिवकुमार याला ठार मारण्याचा होता. परंतु तो न सापडल्याने त्यांनी त्याच्या तरूण मुलाला बेदम मारहाण केली. हल्लेखोरांचा जातीय द्वेष एवढा तीव्र होता की, दलितांच्या घरातील अन्नधान्य, पंखे, टीव्ही पेटवून देण्यात आले. हल्लेखोरांचा हा नंगानाच चालू असताना पोलिसदेखील त्यांना प्रोत्साहन देत होते. काय वाटेल ते करा असे पोलीस सांगत असल्याचे पीडित महिलांनी नंतर प्रसार माध्यमांना सांगितले. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या व पोलीस फौजफाटा आला असता गावाच्या वेशीवरच हल्लेखोरांच्या सहकाऱ्यांनी नाकेबंदी करून त्यांना रोखून धरले. ज्यात स्थानिक भाजप व अन्य हिंदुत्ववादी व ठाकूरांचे नेते सामील होते. म्हणून वरिष्ठ पोलीस-प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुंडगिरी करणाऱ्यांविरुद्ध बलप्रयोगाचा वापर केला नाही आणि दलितांना गुंडांच्या हवाली सोडले.
दलितांवर केलेल्या या भीषण हल्ल्याची पार्श्वभूमी अशी आहे की, या शब्बीरपूर गावातील चर्मकार जातीतील दलितांनी काही वर्षांपूर्वी बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे व डॉ बाबसाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ते पाईक आहेत. संत रोहिदासांच्या बंडखोर विचारांचेही ते चाहते आहेत. या वर्षाच्या १४ एप्रिल या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी त्यांना गावातील संत रोहिदास मंदिराच्या आवारातील मोकळ्या जागेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा होता. त्या पुतळ्यासाठी चबुतरा बसविण्याचे काम सुरु असताना स्थानिक ठाकूर समाजाच्या लोकांनी आक्षेप घेण्यास सुरवात केली. ते म्हणू लागले की धेड की मूर्ती नही लगने देंगे, तसेचधेड की उपर की तरफ दिखनेवाली उंगली निचे लो आणि रोहिदास मंदिराच्या आवाराची भिंत खूप उंच बांधायाने की धेड की मूर्ती बाकी लोगोंको नही दिखनी चाहिये ठाकूरांच्या या सर्व जातीय व द्वेषमूलक आक्षेपांना दलितांनी नकार देताच ठाकूर खवळले व त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांमार्फत पोलिसांवर दबाव आणून पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बांधकामास परवानगी नाकारली व बांधकाम थांबविण्यास सांगितले.
याबाबत स्थानिक दलित कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, पुतळा मंदिराच्या आवारात आहे व जागा आमच्या मालकीची असल्याने प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही. परंतु पोलिसांनी दलितांचे न्याय्य म्हणणे ऐकून न घेता ठाकूरांच्या दबावाखाली बांधकाम बंद पाडले व भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा पुतळा बसविण्यास जातीय मानसिकतेतून विरोध केला. गावातील रोहिदासाचे हे मंदिर मुख्य नाक्यावर असल्याने रोजच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन दलितांसह ठाकूरांनाही घ्यावे लागेल याच कारणास्तव पुतळ्यास विरोध होतो आहे, असे स्थानिक दलितांचे मत आहे.
गावात तणाव वाढू नये म्हणून स्थानिक दलितांनी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम शांततेत साजरा केला. परंतु त्या दिवशीही ठाकूर समाजातील ५० पेक्षा जास्त तरुणांनी मोटारसायकलवरून चमार चट्टे मुर्दाबाद’, आंबेडकर मुर्दाबाद,राणा प्रताप जिंदाबाद अशा दलितांचा अपमान करणाऱ्या घोषणा देऊन दलितांना हिणवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दलित समाजात प्रचंड  संताप निर्माण झाला होता. परंतु दलितांनी संयम पाळला. ठाकूरांच्या दलित द्वेषाचे दुसरे कारण म्हणजे, गावचा सरपंच हा एकदा राखीव जागेवरून व दुसऱ्यांदा जनरल जागेवरून मुस्लीम, ओबिसींच्या पाठिंब्यावर पुन्हा निवडून आला. हे ठाकूरांच्या उच्चवर्णीय मानसिकतेला व अहंकाराला डिवचणारे आहे आणि हाच सरपंच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यास पुढाकार घेत असल्याने त्याच्या विषयीची रागही ठाकूरांच्या मनात होता. आणि या द्वेषातूनच हा हल्ला झाला आहे.
या हल्ल्यामागील दुसरी घटना महणजे २० एप्रिल रोजी शब्बीरपूर जवळील सडकदुधली या गावात आंबेडकर जयंतीच्या नावाखाली भाजपचे खासदार लखनपाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाने बेकायदेशीररित्या शोभायात्रा काढण्यात आली. ज्यात श्रीरामाचा जयघोष, मंदिर वही बनायेंगेच्या घोषणा देत नंग्या तलवारी, बंदूका, काठ्या मिरवत दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले. सडकदुधली गाव हे जातीय-धार्मिक तणावासाठी संवेदनशील मानले जात असल्याने गेली दहा वर्षे तेथे मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही पोलिसांचे कडे तोडून शोभायात्रा गावात घुसवण्यात आली व नारेबाजी करून मशिदीवर दगडफेक करण्यात आली.
त्यामुळे मुस्लीम समुदायाकडूनही प्रतिकार करण्यात आला व वातावरण चिघळले आणि मिरवणुकीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात मारहाण व हिंसाचाराला सुरवात केली. अनेक दुकाने व घरे पेटविण्याचा प्रयत्न केला. दुकानातील सामान रस्त्यावर फेकले व लूटमार सुरु केली. पोलीस कमिशनरच्या गाडीवरही हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना गावाच्या बाहेर हुसकावले. तेव्हा त्यांनी देहराडून-सहारनपूर मार्ग बंद पाडला व गाडीतील प्रवाशांनाही बेदम मारहाण केली. हा सर्व हिंसाचार-धुमाकूळ सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार, नेते कायदा धाब्यावर बसवून घालत होते.
या हिंसाचाराला रोखण्याचा व कायदा सुव्यवस्था पाळण्याचा तेथील पोलीस अधिक्षक लवकुमार यांनी प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर राग व्यक्त करण्यासाठी व सूड घेण्यासाठी या गुंड जमावाने पोलीस अधिक्षकांच्या घरावरच हल्ला केला. त्यांच्या सरकारी घरातील व कार्यालयातील सामान, फर्निचर फोडले तसेच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे फोडले. पोलीस अधिक्षकांची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन मागील दाराने पळाली. या हल्ल्याच्या प्रसंगाचे वर्णन करताना तिने प्रसार माध्यमांना सांगितले, मै आय.पी.एस. की पत्नी हूँ। अलिगढ, गोरखपूर, मुरादाबाद जैसे संवेदनशील जिले में पती के संग रही हूँ। लेकिन सबसे सुरक्षित समझी जानेवाली एस.एस.पी. की कोठीपर ढाई घंटे तक मैने जो मन्जर देखा उससे मैं सहम गई हूँ। मैने अपनी छ: और आठ साल के बच्चों के आँखो में जो खौफ देखा है उसे भूल नही सकती। वे कभी इतनी जोर से चिल्लाकर नही रोए, जितना कल शाम को।
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीची अशी हतबल अवस्था असेल तर गावातील सर्वसामान्य लोकांची या सत्ताधारी हिंदुत्ववादी लोकांच्या दहशतीखाली काय स्थिती झाली असेल? याचा विचार करावा. एवढी सगळी गुंडगिरी भाजपच्या खासदार-आमदार-नेत्यांनी केली; ज्याबाबत देशभरातील प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उठवली तरी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आजतागायत या हिंसाचार प्रकरणी एकालाही साधी अटकही केली नाही व त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले नाहीत. भाजप नेत्यांचा सडकदुधली गावात आंबेडकरांच्या नावाने दलित-मुस्लीम समाजात दंगे घडविण्याचा प्रयत्न होता. परंतु स्थानिक दलितांनी भाजपचा हा डाव ओळखला व ते हिंदत्ववाद्यांच्या खोट्या आंबेडकर प्रेमाला बळी पडले नाहीत. भाजपच्या या हिंसाचाराचा सहारनपूरमधीलभीमआर्मी पासून अनेक आंबेडकरवादी-दलित संघटनांनी तीव्र निषेध केला व जातीय-धार्मिक सलोखा राखला. या दंगलीमागे दलित-मुस्लीम मतांचे धृवीकरण करून आगामी महापालिकेच्या निवडणुकीत हिंदू-दलित मतांचा लाभ उठविण्याचा प्रयत्न होता, जो दलितांनी हाणून पाडला.
सहारनपूर परिसरातील दलित आपल्या भूलथापांना बळी पडत नाहीत व आपल्या जाळ्यात अडकत नाहीत हे भाजपच्या लक्षात आल्याने त्यांनी परिसरातील ठाकूर-रजपूतांना एकत्र आणण्यासाठी ५ मे २०१७ रोजी सहारनपूरमधील शब्बीरपूर जवळच्या सिमलाना या गावात राणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून महासंमेलन आयोजित केले. या संमेलनात भाजपचे खासदार, आमदार आणि प्रमुख पाहणे म्हणून माजी खासदार, फुलनदेवीचा खूनी शेरोसिंग राणा याला तो जेलमधून पॅरोलवर बाहेर असताना बोलाविले.
या संमेलनाची प्रचंड मोठी मिरवणूक हातात तलवारी-बंदुका घेऊन, डीजेचा दणदणाट करीत पोलीस परवानगी शिवाय काढली. तेव्हा शब्बीरपूर गावात दलित-ठाकूरांमध्ये तणाव असल्याने परवानगी देऊ नये असे तेथील सरपंच शिवकुमार यांनी पोलिसांना सांगितले व डीजे वाजविण्यासही प्रतिबंध घालण्याची विनंती केली. पोलिसांनी डीजे थांबविल्यावर मिरवणुकीतील लोकांनी चमार चट्टे मुर्दाबाद,आंबेडकर मुर्दाबाद,रोहिदास मुर्दाबाद अशा दलितविरोधी घोषणा देत मिरवणूक नेली.
मिरवणुकीतील ४०-५० मोटारसायकलस्वार पुन्हा दलित वस्तीत येऊनतुम्ही मिरवणुकीला विरोध का केला? असे विचारत त्यांनी दलितांना मारहाण केली. रोहिदासाच्या मंदिरात घुसून मूर्तीवर लघुशंका केली आणि मंदिरावर व घरांवर ज्वलनशील द्रव असलेले फुगे फेकून आग लावण्यास सुरवात केली. ज्या दलितांनी त्यांना विरोध केला त्यांनाही लोखंडी गजांनी व काठ्यांनी बेदम मारहाण केली. याच मारहाणीच्या व आगीच्या कोलाहलात सुमित नावाचा रजपूत समाजाचा तरूण हल्लेखोर प्रचंड धुरात श्वास घुसमटल्याने अत्यवस्थ झाला. त्याला अन्य हल्लेखोरांनी ओढून नेल्यानंतर काही काळाने त्याचे निधन झाले. त्याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा नसल्याने व श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट म्हटले असताना सुद्धा त्याच्या मृत्यूला दलितांनाच जबाबदार धरण्यात आले. आणि अन्य दोन तरुणांनाही शब्बीरपूरच्या दलितांनी ठार मारल्याची अफवा रजपूत संमेलनात पसरवून त्यांना भडकविण्यात आले.
शब्बीरपूरच्या दलितांनी हिंदू धर्मातून बाहेर पडून केलेले बौद्ध धर्मांतर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यासाठी धरलेला आग्रह आणि सतत दोनदा निवडून आलेला दलित सरपंच या सर्व गोष्टींमुळे उच्चवर्णिय ठाकूर-रजपुतांचा जातीय अहंकार दुखावला गेला होता. दलित आता सन्मान व स्वाभिमानाने जगू पाहताहेत, अरे ला कारे म्हणून प्रति जबाब देतात हे बदलते वास्तव सहन न झाल्याने व जातीय विद्वेषाची भावना उफाळून आल्यानेच त्या संमेलनातील हजारो लोक दलित वस्तीवर चाल करून गेले व त्यांनी त्यांच्या घरांची राखरांगोळी केली. केवळ शब्बीरपूरच नाही तर वाटेतील महेशपूर गावातील चर्मकार-दलितांच्या घरांवरही हल्ले केले गेले.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे योगी आदित्यनाथ या ठाकूराचे सरकार आल्यानंतर योगींनी स्थापन केलेली हिंदू युवा वाहिनी ही गुंडांची संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. त्यांनी गोरक्षणेच्या नावाखाली अनेक मुस्लीमांवर खुनी हल्ले केले, लव्ह-जिहादच्या नावाखाली अनेक तरूण-तरुणींवर हल्ले केले, आणि वर उल्लेख केलेल्या सडकदुधलीमध्ये तर पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. आणि एवढा हल्ला करूनही योगी सरकारने कुणावरही कारवाई केली नाही. उलट ज्या भाजप खासदार, आमदारांनी पोलिसांच्या घरांवर हल्ला केला त्यांच्याच सांगण्यावरून लवकुमारसारख्या कर्तव्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक आय.पी.एस. अधिकाऱ्याची सहारनपूरहून बदली केली गेली. त्यामुळेच या गुंडांचे मनोबल वाढले आणि त्यांनी कायदा धाब्यावर बसवून विनापरवानगी नंग्या तलवारी, हत्यारे घेऊन दलित वस्तीवर निर्घृण हल्लाबोल केला व प्रशासन व पोलीस गुंडांच्या दबावाखाली होणाऱ्या दलितांच्या जीवितांची व घरादारांची होणारी राखरांगोळी पाहत राहिले.
परंतु एवढ्यानेच दलितांवरील अन्याय थांबला नाही. तर ज्या दलितांच्या घरांची राखरांगोळी झाली, ते जातीयवादी ठाकूरांच्या मारहाणीत जबर जखमी झाले, त्या दलित-स्त्री-पुरुषांवर ३०७ सारखे खुनाचे गंभीर खोटे गुन्हे दाखल करून, पीडितांनाच गुन्हेगार ठरवून त्यांना पुन्हा त्रास देण्याचे काम पोलीस, ठाकूर व भाजपच्या नेत्यांच्या दबावाने करीत आहेत. वर उल्लेख केलेला अग्नीभास्कर बौद्ध व त्याची जखमी पत्नी १५ दिवस रुग्णालयात अस्वस्थ होते. त्यांच्यावरही ३०७ कलमांचे गुन्हे दाखल केले आहेत. कायद्याचे पालन करणारा शिवकुमार या दलित सरपंचाला पोलिसांनी खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात ठेवले आहे. तसेच गावातील सर्व दलित तरुणांना खोट्या गुन्ह्याखाली अडकविले आहे. त्यामुळे येथील तरूण ठाकूरांच्या व पोलिसांच्या भीतीने गाव सोडून पळून गेले आहेत.
शासनाने मयत रजपूत तरुणाला १५ लाखाची व जखमी रजपूत तरुणांना १ लाखाची त्वरीत मदत दिली. परंतु ज्या दलितांच्या घरादाराची राख झाली व जे जखमी झाले त्यापैकी फक्त काही जणांनाच अवघी २५ हजारांची मदत दिली. परंतु घर-संसार उभे करण्यासाठी फुटकी कवडीही दिली नाही. यामधून भाजपच्या योगी सरकारचे जातीयवादी रूप पुन्हा पाहायला मिळाले आहे. जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला पण शब्बीरपूरच्या दलितांचा संसार मात्र अजूनही उघड्यावरच भेसूर अवस्थेत पडला आहे.
शब्बीरपूरच्या दलितांवरील निर्घृण हल्ल्याची संतप्त प्रतिक्रिया उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश व दिल्ली परिसरातील शिक्षित दलित तरुणांमध्ये ऍड चंद्रशेखर रावण यांच्या पुढाकाराने २१ मे रोजी दिल्लीत जंतर-मंतर येथे भरलेल्या भीमआर्मीच्या हजारोंच्या विशाल रॅलीत पाहावयास मिळाली. ब्राह्मणी-भांडवली प्रसारमाध्यमांनी जरी त्याची बातमी दिली नाही तरी सोशल मिडियातून ती घरोघरी गेली. आणि भीमआर्मीच्या या विशाल रॅलीचा धसका घेऊन जातीयवादी सरकार हा दलित प्रतिरोध, ऍड चंद्रशेखरला अटक करून दडपायचा प्रयत्न करीत आहे. पण भीमआर्मीला देशभरातील दलित तरुणांकडून व पुरोगामी, समतावादी फुले- आंबेडकरी संघटनांचा जो वाढता पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे सरकारपुढे नवे आव्हान उभे राहील. शब्बीरपूरच्या हल्ल्याच्या  निषेधार्थ बसपाच्या मायावतींनी जी रॅली २३ मे ला घेतली त्या रॅलीनंतरही ठाकूरांनी दलित तरुणांवर खुनी हल्ले केले व पोलीस गोळीबारात ३ तरूण ठार झालेत. दलित-मुस्लीमांच्या प्रेतांवरच रास्वसंघाचे हिंदू राष्ट्र उभे राहणार आहे आणि हा खुनी चेहरा दिसू नये म्हणूनच ते राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंदसारखे भटाळलेले दलित कार्ड वापरतात.

सहारनपूर दलितांवरील हल्ल्याच्या आरोपींना तातडीने कठोर शासन करावे व दलितांना त्वरीत न्याय मिळावा म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो सदस्य बृंदा करात व सुभाषिनी अली, दिल्लीच्या दलित शोषण मुक्ती मंचाचे सरचिटणीस नथ्थू प्रसाद, व सहारनपूरचे पीडित राजकुमार यांनी पीडितांवरील अन्यायाचे सविस्तर निवेदन राष्ट्रपतींना व मानवाधिकार आयोगाकडे दिले. आणि देशभर दलितांवरील या हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने आयोजित करून भाजपच्या जातीयवादी सरकारचा निषेध केला.
दलितांवर एवढा भीषण हल्ला होऊनसुद्धा भाजपसोबत सत्तेत असलेले केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, दुसरे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, खासदार उदितराजसारखे तथाकथित दलित नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पीडितांना भेटायलाही फिरकले नाहीत.
  
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे. असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे- रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर-

mahacpim@gmail.com

आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता-

Jeevan Marg
 
A/C Number- 04220100009541

 IFSC CODE- BARBOWRLIX

 Bank of Baroda, Worli Branch

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी (१) - सी. पी. भांबरी

ऐतिहासिक कर्जमाफी की ऐतिहासिक फसवणूक?

मोदी सरकार : शेतकऱ्यांशी केलेल्या गद्दारीची तीन वर्षे!