ऑक्टोबर क्रांतीचा वैभवशाली वारसा : आधुनिक काळाच्या संदर्भात ऑक्टोबर क्रांतीचा अन्वय (१)


 - सीताराम येचुरी - सरचिटणीस, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
(त्रिसूर, केरळ येथे १३ जून रोजी घेण्यात आलेल्या ईएमएस स्मृती २०१७ या चर्चासत्रात खासदार सीताराम येचुरी यांचे उद्घाटनपर भाषण)
ईएमएस स्मृती २०१७ या चर्चासत्राचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद वाटतो आहे. दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी आपण ईएमएस यांच्या नावाने हे चर्चासत्र घेत आहोत ही मला निश्चितच गौरवाची गोष्ट वाटते. गेली १९ वर्षे मुळीच खंड न पाडता नित्यनेमाने असे विचार प्रवर्तक चर्चासत्र आयोजित करणाऱ्या संयोजकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मला आशा आहे की, भविष्यात ते असे चर्चासत्र केवळ राष्ट्रीय स्वरूपाचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे व दर्जाचे करतील.
२०१७ साली, म्हणजे या वर्षी, समाजवादी ऑक्टोबर क्रांती या एका महान घटनेला बरोबर १०० वर्षे पूर्ण होत आहेत. २०व्या शतकातील या घटनेने जागतिक इतिहासाला व मानवी संस्कृतीच्या प्रगतीला एक नवेच गुणात्मक वळण दिले. ही क्रांती म्हणजे एक असाधरण घटना होती आणि तिने मार्क्सवाद ही केवळ यांत्रिक गोष्ट नसून ते एक निर्मितीक्षम विज्ञान आहे व त्याच्या आधाराने आपल्याला मानवी संस्कृतीचा विकास एका शोषणविरहित जगाच्या निर्मितीमध्ये करता येईल हे सिद्ध केले. ऑक्टोबर क्रांतीच्या अन्वयाचे हे महत्वाचे त्रिकालाबाधित सूत्र आहे.
फ्रेडरिक एंगल्सने मार्क्सच्या मृत्यूनंतर कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या पुस्तकाच्या १८३३ साली निघालेल्या जर्मन आवृत्तीला एक अतिशय मार्मिक प्रस्तावना लिहिली आहे. त्यात तो असे म्हणतो :
या मॅनिफेस्टोतील सर्वात मूलभूत विचार हा आहे की, इतिहासाच्या प्रत्येक कालखंडातील राजकीय व बौद्धिक इतिहासाचा पाया हा त्या कालखंडातील आर्थिक उत्पादन आणि सामाजिक रचना हा असतो. अगदी सुरवातीला जमिनीची मालकी सामुदायिकरीत्या सर्वांची असण्याचा काळ होता पण त्यानंतर अशा जीवनपद्धतीचा विलय झाला आणि त्यानंतरचा इतिहास म्हणजे वर्गयुद्धांचा इतिहास आहे; समाजाच्या विकासाच्या वा प्रगतीच्या विविध पातळ्यांवर शोषित आणि शोषण करणारे, सत्ताग्रस्त आणि सत्तावंत, यांच्यामधील संघर्षाचा हा इतिहास आहे. आता हा संघर्ष अशा स्तरावर पोहोचला की, शोषित कामगार वर्ग आपले शोषण व दमन करणाऱ्या वर्गाशी केवळ आपले स्वत:पुरते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत नाही तर त्याच वेळी संपूर्ण समाजाला व त्यातील सर्व शोषितांना त्यांचे दमनशोषण करणाऱ्या भांडवलदार वर्गापासून मुक्त करण्यासाठी तो वर्गलढा उभारत असतो आणि संघर्ष करीत असतो. हा मूलभूत विचार मांडण्याचे सर्व श्रेय निरपवादपणे केवळ आणि फक्त मार्क्सचे आहे.
ऑक्टोबर क्रांतीने सिद्ध केलेली आणि मिळवलेली गोष्ट ही होती. तिने केवळ कामगार वर्गालाच नव्हे तर सर्व शोषित समाजाला शोषणमुक्त केले होते. मार्क्स आणि मार्क्सवादाने मांडलेला प्रत्येक सिद्धांत या क्रांतीच्या यशाने खरा असल्याचे शाबीत केले. भांडवली व्यवस्थेत प्रत्येकाच्या क्षमतेनुसार काम असा नियम असतो. पण त्या सामाजिक व्यवस्थेच्या ऐवजीप्रत्येकाच्या कामानुसार दाम असे मानणाऱ्या समाजवादी व्यवस्थेपर्यंत जाणे आणि शेवटीप्रत्येकाच्या गरजेनुसार दाम असे मानणाऱ्या वर्गविहीन कम्युनिस्ट समाजाची निर्मिती करणे म्हणजे मानवी संस्कृतीचा विकास आहे असे मार्क्सवाद मानतो. ऑक्टोबर क्रांतीने ते सिद्ध केले. माणसेच शेवटी त्यांच्या स्वत:च्या नियतीची, जीवनाची शिल्पकार असतात, ती स्वत:च आपले जीवन घडवतात हेदेखील या क्रांतीने सिद्ध केले. अन्यायाखाली भरडून निघणारे शोषित वर्ग इतिहासात हस्तक्षेप करू शकतात आणि इतिहासाचा मार्ग व त्याचे भविष्यदेखील आमूलाग्रपणे बदलू शकतात हे देखील याच क्रांतीने निर्विवादरीत्या सिद्ध केले.
अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सर्व शक्ती मार्क्सवादावर तुटून पडल्या होत्या. मार्क्सवादाने मांडलेले सिद्धांत आणि त्याने काढलेली अनुमाने म्हणजे जणू काही दिवास्वप्न आहे अशीही त्याची संभावना करण्यात आलेली होती. परंतु रशियन राज्यक्रांतीने आणि त्यानंतर झालेल्या सोविएत संघाच्या स्थापनेने मार्क्सवाद आणि त्याचे निष्कर्ष किती अचूक होते हे सिद्ध केले. मार्क्सवाद हे नवसमाजनिर्मितीचे एक सर्जनशील विज्ञान आहे हे सूत्र अत्यंत सार्थपणे साऱ्या जगाच्या प्रत्ययास आणून दिले.
ऑक्टोबर क्रांतीचे महत्व हे आहे की, तिने शोषणविहीन समाजव्यवस्था प्रत्यक्षात आणता येते हे दाखवून दिले. इतकेच नव्हे तर अशा अवस्थेत मानवी निर्मितीक्षमता कर्तृत्वाच्या विविध क्षेत्रांमध्ये आजपर्यंत कधीही घेतल्या नव्हत्या अशा उत्तुंग भराऱ्या घेऊ शकते याचा वस्तुपाठच सादर केला. समाजवादी समाजव्यवस्थेने एका मागास समाजाचे रूपांतर साम्राज्यवादी शक्तींच्या तोडीस तोड ठरेल अशा एका आर्थिकदृष्ट्या व शस्त्रसज्ज अशा महाबलाढ्य समाजवादी व्यवस्थेमध्ये केले. हे सत्य समाजवादाची ताकद आणि शक्ती दाखवून देते. सोविएत युनियनमध्ये समाजवादाची करण्यात आलेली उभारणी हा मानवी कर्तृत्वाचा एक ढळढळीत आणि उत्तुंग आलेख आहे.
२०व्या शतकाचा इतिहास ऑक्टोबर क्रांतीनंतर झालेल्या समाजवादाच्या स्थापनेने नियत केलेला आहे. फॅसिझमच्या पराभवात सोविएत रशियाने फार मोठी कामगिरी बजावली. त्यानंतर निर्माण झालेल्या पूर्व युरोपियन समाजवादी देशांच्या जागतिक पातळीवरील घडामोडींवर फार मोठा प्रभाव पडला. दुसऱ्या महायुद्धात फॅसिझमला नेस्तनाबूत करण्यात सोविएत लाल सेनेने नेत्रदीपक कामगिरी बजावली; किंबहुना फॅसिझमचा निर्णायक पराभव करण्यात लाल सेनाच कारणीभूत होती. तिच्यातून जगभरातील देशांमध्ये वसाहतवादी शक्तींच्या वर्चस्वाखाली गुलामीत खितपत पडलेल्या देशांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी साम्राज्यवादी देशांचे जोखड झुगारून देणारे लढे करून आपले स्वातंत्र्य मिळवले. चिनी क्रांतीलढ्याने मिळवलेले ऐतिहासिक यश, व्हिएतनामी जनतेचे झुंझार लढे, कोरियन जनतेचा अभूतपूर्व संघर्ष, आणि क्युबा येथील क्रांतीचे दैदिप्यमान यश या साऱ्याच घटनांचा जागतिक इतिहासावर अतिशय मोठा परिणाम झाला, खोल प्रभाव पडला हे मान्यच करायला हवे.
सोविएत क्रांतीने साध्य केलेली काही उद्दीष्टे पाहिली तर दारिद्र्य आणि निरक्षरता यांचे उच्चाटन, बेरोजगारी व बेकारीचे निर्मूलन, शिक्षण, आरोग्य आणि निवारा आदि क्षेत्रात उभारण्यात आलेले सामाजिक सुरक्षेचे भक्कम कवच- या साऱ्या गोष्टींचा मोठाच प्रभाव जगभरातील श्रमिकांच्यावर पडला. इतकेच नव्हे तर त्यांना त्यातून नवा आत्मविश्वास आणि त्यांच्या शोषकांविरुद्ध लढण्यासाठी एक अद्भुत प्रेरणास्रोत गवसला.
जागतिक भांडवलशाहीने समाजवादाने तिला दिलेले आव्हान स्वीकारले ते काही कल्याणकारी योजना राबवून आणि कामगारांना यापूर्वी सातत्याने नाकारलेले काही हक्क त्यांना देऊ करून! किंबहुना भांडवली देशांनी दुसऱ्या महायुद्धानंतर स्वीकारलेल्या कल्याणकारी राज्य आणिसामाजिक सुरक्षांचे जाळे या संकल्पनाच मुळी समाजवादी देशांतील लोकांनी सोविएत युनियनमधील समाजवादी व्यवस्थेने प्रभावित होऊन केलेल्या वर्गसंघर्षातून उचलल्या होत्या. आज आपण लोकशाही हक्क आणि नागरी स्वातंत्र्य या दोन गोष्टी मानवी संस्कृतीपासून वेगळ्या काढता येणार नाहीत, त्या मानवी संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत असे मानतो. या कल्पनादेखील सोविएत युनियन आणि अन्य समाजवादी देशांमधल्या लोकांनी सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या संघर्षातून आलेल्या आहेत. या संकल्पना म्हणजे भांडवली वर्गसत्तेने उदार होऊन लोकांवर केलेली कृपा आहे असे समजायचे मुळीच कारण नाही.
या क्रांतिकारी परिवर्तनामधून मानवी संस्कृतीमध्ये अतिशय मोठे परिवर्तन घडून आले आणि आधुनिक जगावर त्याचा फार मोठा, पुसता येणार नाही असा ठसा उमटला. संस्कृतीच्या सर्व क्षेत्रामध्ये, म्हणजे अगदी सौंदर्यशास्त्रापासून ते विज्ञानापर्यंत अनेकविध क्षेत्रात, आपल्याला हा प्रभाव जाणवतो. सिनेमाच्या क्षेत्रात आयझेनस्टाईनने आणलेले विलक्षण क्रांतिकारी म्हणावे लागतील असे बदल असोत वा अवकाशात सोडलेले स्फुटनिक यान असो, आधुनिक विज्ञानाच्या कक्षा विलक्षण वेगाने अगदी अवकाशापर्यंत रुंदावत गेलेल्या दिसतात ते याच क्रांतीच्या प्रभावामुळे.
ऑक्टोबर क्रांतीचा वैशिष्ट्यपूर्ण असा वैभवशाली वारसा :
समाजवादी ऑक्टोबर क्रांतीने अस्तित्वात आणलेले सोविएत युनियन आज उरलेले नाही. त्याचे विघटन का झाले याची कारणमीमांसा आपण पुढे करू. परंतु सोविएत युनियन अस्तित्वात नसले तरी ऑक्टोबर क्रांतीचा वैभवशाली वारसा चार वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला तपासून पाहता येतो. मानवी संस्कृतीला भांडवली समाजरचनेकडून समाजवादी व्यवस्थेकडे नेण्यासाठी करण्याच्या कामाच्या या प्रमुख दिशा आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. तोच आपल्या कार्याचा कणा असेल. म्हणूनच आजच्या आधुनिक काळात ऑक्टोबर क्रांतीचा वैशिष्ट्यपूर्ण वारसा आपण समजून घेतला पाहिजे. त्यासाठी खाली निर्देशित केलेल्या चार महत्वपूर्ण मुद्द्यांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो :
अ) लेनीनने आपल्या समकालीन जगाचे मार्क्सवादी दृष्टीने आकलन करण्यासाठी भांडवली विकासाच्या मार्क्सने दाखवलेल्या दिशांच्या चौकटीत आपले विचार मांडले. त्याने असे दाखवून दिले की भांडवली विकासात भांडवलाचे केंद्रीकरण झाल्यामुळे मक्तेदार भांडवलशाही तयार होते. आणि तिची परिणती साम्राज्यवादात होते. याचे बरेच परिणाम आहेत. पण त्यातील एक प्रमुख मुद्दा असा आहे की, साम्राज्यवाद हा सर्व जगाला भांडवली शोषण व्यवस्थेच्या कक्षात आणतो आणि त्याचवेळी त्यातून एक भयंकर अंतर्विरोधही सुरू होतो. जगात उपलब्ध असणाऱ्या साऱ्या उत्पादनसाधनांना आपल्याच ताब्यात आणण्यासाठी साम्राज्यवादी देशांमध्ये एक जीवघेणी स्पर्धा चालू होते. लेनीनने असा सिद्धांत मांडला की साम्राज्यवादाची ही भक्कम साखळी तोडायची असेल तर त्यातील सर्वात कमजोर कडीवर प्रहार करायला हवा. विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात, जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले नी संपुष्टात आले, त्यावेळी ही सर्वात कमजोर कडी म्हणजे रशिया हा देश होता. त्यामुळे रशियन कामगार वर्गाला साम्राज्यवादी देशांमधल्या या युद्धाचे रूपांतर नागरी स्वातंत्र्याच्या युद्धात करण्याची संधी उपलब्ध झाली. सध्याच्या काळात देखील हे स्पष्टच आहे की साम्राज्यवादाला सातत्यपूर्ण विरोध केल्याशिवाय जगातील कोणत्याही देशात क्रांती होऊ शकत नाही.
आज आपल्याला साऱ्या जगभर जे जागतिकीकरण फैलावलेले दिसते तेही साम्राज्यवादाचेच रूप आहे. त्यामुळे ऑक्टोबर क्रांतीचे हे वर दाखवलेले ठळक वैशिष्ट्य आपल्यासाठी खूपच महत्वाचे ठरते. म्हणून साम्राज्यवादी जागतिकीकरणामध्ये सगळ्यात कमजोर कडी कोणती हे तपासून तेथील भांडवलदार वर्गाच्या सत्तेवर राजकीय हल्ला बोल करायला हवा.
ब) रशिया हा त्या काळी तुलनेने कमी भांडवली विकास झालेला देश होता. ऑक्टोबर क्रांतीने रशियात साम्राज्यवादाची साखळी तोडली. त्यावेळी लोकांना असे वाटत होते की, समाजवादाकडे जाणाऱ्या वाटचालीची सुरवात साम्राज्यवादाच्या अधिक विकसित झालेल्या केंद्रांमधून, म्हणजे इतर प्रगत देशांमधून होईल. मात्र जर्मनीतील क्रांतीचा फसलेला प्रयत्न आणि कार्ल लिबनेख्ट व रोझा लक्झेंबर्ग यांच्या हत्या यांमुळे ते काही प्रत्यक्षात उतरले नाही. लेनीनला असे वाटत होते की सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात अधिक भांडवली विकास झालेल्या जर्मनीतील पुढारलेला कामगार वर्ग मागास राहिलेल्या रशियातील समाजवादाचे अस्तित्व टिकवणे हे एक फार मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे होते. एका देशात समाजवाद या संकल्पनेला धरून एका मागास अर्थव्यवस्थेला समाजवादी व्यवस्थेकडे संक्रमण करणे शक्य व्हावे म्हणून लेनीनने क्रांतीचे वेगवेगळे टप्पे असतात असा सिद्धांत मांडला. क्रांतीने एकदा लोकशाही टप्पा गाठल्यावर पुढच्या समाजवादी टप्प्याकडे संक्रमण कसे करावे, वाटचाल कशी करावी, हे समजून घेण्यासाठीही आपल्याला ऑक्टोबर क्रांती उपयुक्त ठरू शकते. त्यादृष्टीने आजच्या काळात ऑक्टोबर क्रांतीच्या अनुभवाकडे पाहायला हवे.
क) एखाद्या मागास देशात क्रांती यशस्वी करायची असेल तर त्यासाठी तेथील कामगार आणि शेतकऱ्यांची मजबूत एकजूट करणे ही एक अत्यावश्यक बाब आहे. पॅरिस कम्यूनच्या अनुभवावरून असे लक्षात आले होते की तिथल्या सत्ताधारी वर्गांनी शेतकऱ्यांना कामगारांच्या विरोधात यशस्वीरीत्या उभे केले होते. यातून धडा घेऊन लेनीनने असे मांडले की शेतीक्षेत्रात ज्यांचे सातत्याने शोषण होते त्या श्रमिकांना क्रांतीच्या बाजूने उभे करणे अतिशय आवश्यक आहे. कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली कामगार, शेतकरी, श्रमिकांची भक्कम एकजूट बांधणे हे आजच्या काळातील सामाजिक परिवर्तनाची आस बाळगणाऱ्या क्रांतिकारकांसमोर आव्हान आहे कारण ते क्रांतिकार्यासाठी अतिशय उत्तम हत्यार बनू शकते.
ड) लेनीनच्या राष्ट्रीय आणि वासाहतिक प्रश्न या सिद्धांताने साम्राज्यवादाविरुद्ध लढा उभारताना वासाहतिक सत्तेखाली खितपत पडलेल्या लोकांचे स्वातंत्र्यलढे आणि जगभर चाललेले साम्राज्यवादविरोधी लढे यांच्यात समन्वय व एकजूट साधण्यावर भर दिला होता. या जगभरच्या स्वातंत्र्यलढ्यांच्या सिद्धांताचा एवढा मोठा प्रभाव त्याकाळी होता की त्यावेळी व्हिएतनामवर राज्य करणाऱ्या फ्रान्सच्या विरोधात फ्रान्समध्ये राहून चळवळ उभ्या करणाऱ्या हो चि मिन्ह यांनी नंतर या प्रभावासंबंधात असे म्हटले होते की-
एका कॉम्रेडने मला राष्ट्रीय आणि वासाहतिक प्रश्न हा त्याकाळी ल ह्युनॅनिटी (मानवता) या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचायला दिला होता. या लेखात मांडलेल्या सिद्धांतातील सर्व राजकीय संकल्पना समजणे अवघड होते. पण पुन: पुन्हा वाचल्यानंतर मात्र मला त्यातला मुख्य अर्थ समजून घेता आला. त्यानंतर माझ्या मनात दाटून आलेल्या भावनांचा कल्लोळ, उत्साह, स्पष्टपणा आणि आत्मविश्वास यांचे वर्णन मी कसे करू? आनंदाने माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. जरी मी माझ्याच खोलीत बसलो होतो, तरीदेखील जणू काही प्रचंड गर्दीने जमलेल्या श्रोतृवृंदाला संबोधित करत असल्यासारखा मी मोठमोठ्यांदा बोलू लागलो. माझ्या देशबांधवांनो, हुतात्मा होऊ पाहणाऱ्या सहकाऱ्यांनो, आपल्याला हवी असलेली गोष्ट ती हीच आहे. हाच आपल्या मुक्तीचा मार्ग आहे. (‘The Path Which Led Me to Leninism’, 1960, Selected Works of ‘Ho Chi Minh’, Vol. IV.)
आज जग ज्या बिंदूवर आहे, त्या ठिकाणी साम्राज्यवादाच्या विरोधात जागतिक लढा बळकट करणे हे सर्व क्रांतिकारी लोकांसमोर उभे ठाकलेले आव्हान आहे. साम्राज्यवादी जागतिकीकरणाने लादलेल्या अनेक यातनांच्या विरोधातले असे लढे सर्व जगभरच्या देशांमध्ये, खास करून दक्षिण अमेरिकेत चालू आहेत. एकीकडे हे लढे आहेत तर दुसरीकडे साम्राज्यवादाने केलेल्या सैनिकी हस्तक्षेपाविरुद्ध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भयानक दमनाविरुद्ध करण्यात येणारे लढे आहेत. या दोन्ही लढ्यांमध्ये जागतिक आणि स्थानिक पातळ्यांवर जर एकजूट झाली तर साम्राज्यवादाचा यशस्वीरित्या प्रतिकार करता येईल. हा लढा बळकटपणे उभा करता आला तर त्यातूनच आपण मानवतेच्या स्वातंत्र्याकडे, समाजवादाकडे जाण्याचा मार्ग निर्माण करू शकतो. ऑक्टोबर क्रांतीचा विचार हा या चार मुख्य अंगांनी केला तर आजच्या काळाला तो किती सुसंगत होईल हे आपल्या लक्षात येईल.
(क्रमश:)                                                                                                  (अनुवाद : डॉ. माया पंडित)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे. असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे- रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर- mahacpim@gmail.com

' 022-24951576 / Fax: 022-24961525

आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता-

Jeevan Marg
 
A/C Number- 04220100009541

 IFSC CODE- BARBOWRLIX

 Bank of Baroda, Worli Branch
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी (१) - सी. पी. भांबरी

ऐतिहासिक कर्जमाफी की ऐतिहासिक फसवणूक?

मोदी सरकार : शेतकऱ्यांशी केलेल्या गद्दारीची तीन वर्षे!