त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण



(केंद्र सरकारच्या दबावामुळे सरकारी माध्यमांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचे भाषण दूरदर्शन व आकाशवाणीवरून प्रसारित करायला दिलेला नकार म्हणजे सरकारी दडपशाही आणि हुकुमशाहीची नांदीच आहे. सरकारने जरी हे भाषण प्रसारित करण्यावर बंदी घातली तरी सामाजिक माध्यमांनी या भाषणाला खूपच उचलून धरले. जीवनमार्गच्या वाचकांसाठी त्याचे भाषांतर आम्ही सादर करीत आहोत.)

प्रिय त्रिपुरावासी,

स्वातंत्र्यदिनाच्या शुभप्रसंगी मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. स्वातंत्र्य संग्रामातील महान शहिदांच्या स्मृतींना मी आदरांजली वाहत आहे. आज आपल्यामध्ये असलेल्या स्वातंत्र्या सैनिकांनाही मी विनम्रतेने अभिवादन करीत आहे.
स्वातंत्र्यदिन हा केवळ एक समारंभ साजरा करण्याचा प्रसंग नाही. भारतीयांचे या दिवसाशी असलेले भावनिक संबंध आणि त्याचे ऐतिहासिक महत्व पाहता, एक राष्ट्रीय आत्मपरिक्षणाचा दिवस म्हणून साजरा करण्याचा दिवस म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे.        
या स्वातंत्र्यदिनी आपल्यासमोर बरेच समयोचित, महत्वाचे समकालीन मुद्दे आहेत. विविधतेतील एकता हा भारताचा पारंपारिक वारसा आहे. धर्मनिरपेक्षतेसारख्या महान मूल्यांनी भारतियांना एक राष्ट्र म्हणून एकत्र ठेवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. पण आज धर्मनिरपेक्षतेच्या मूळ भावनेवरच हल्ला होत आहे. धर्म, जात आणि समुदायाच्या नावावर आपल्या राष्ट्रीय जाणीवांवर आक्रमण करून, भारताचे रूपांतर एका विशिष्ठ धर्माच्या राष्ट्रात करण्याची भावना भडकवून, गोमातेच्या रक्षणाच्या नावाखाली आपल्या समाजात फूट पाडण्याचे आणि नको असलेले गोंधळ निर्माण करण्याची कारस्थाने आणि प्रयत्न केले जात आहेत. या सर्व गोष्टींमुळे अल्पसंख्य आणि दलित समाजांवर प्रचंड हल्ले होत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या भावनेच्या चिंधड्या चिंधड्या उडत आहेत. त्यांच्या जीवनावरच संकट कोसळलेले आहे. अशा पापी प्रवृत्तींना आसरा देता येणार नाही, त्यांना खपवून घेता येणार नाही. असे विघातक आणि फूटपाडे प्रयत्न आपल्या स्वातंत्र्य लढ्याची उद्दीष्टे, स्वप्न आणि आदर्शांच्या अगदी विरुद्ध आहेत. स्वातंत्र्य लढ्याचा भाग नसलेल्या, खरे तर स्वातंत्र्य संग्रामाशी गद्दारीच करणाऱ्या, अत्याचारी, लुटारू आणि निर्दयी ब्रिटिशांचे लांगूलचालन करणाऱ्या, देश-द्रोही शक्तींशी युती करणाऱ्या शक्तींचे अनुयायी आज वेगवेगळी नावे आणि रंग परिधान करून भारताच्या एकता आणि अखंडतेच्या मुळांवरच घाव घालत आहेत. प्रत्येक निष्ठावंत आणि देशभक्त भारतीय नागरिकाने एकसंघ भारताच्या आदर्शांना वचनबद्ध राहण्याची आणि अशा विघातक कारस्थानांना व हल्ल्यांच्या प्रयत्नांना चोख उत्तर देण्याची शपथ घेतली पाहिजे. आपण सर्वांनी मिळून अल्पसंख्यक, दलितांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी आणि आपल्या देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी संघटित प्रयत्न केले पाहिजेत.
आज आहेरे आणि नाहीरेंमधली दरी वाढत चालली आहे. देशाची अवाढव्य संसाधने आणि संपत्ती मूठभर लोकांच्या हातात केंद्रीत होत आहेत. आपली बहुसंख्य जनता दारिद्र्यात होरपळत आहे. हे लोक अमानुष शोषणाचे बळी आहेत. ते अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि निश्चित उत्पन्न असलेल्या सुरक्षित रोजगारापासून वंचित ठेवले जात आहेत. हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या विपरीत आहे. आपली सध्याची राष्ट्रीय धोरणे या परिस्थितीला पूर्णपणे जबाबदार आहेत. ही जन-विरोधी धोरणे परतवावी लागतील. पण हे फक्त बोलून होणार नाही. त्यासाठी वंचित आणि दु:खीकष्टी भारतियांनी उठण्याची, बोलण्याची आणि निर्भयपणे, संघटितपणे अखंड विरोध करण्याची गरज आहे. आपल्याला निश्चितपणे बहुसंख्य भारतीयांच्या हितांची जपणूक करणाऱ्या पर्यायी धोरणांची आवश्यकता आहे. असे पर्यायी धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी वंचित आणि दु:खीकष्टी भारतियांनी ह्या स्वातंत्र्यदिनी एक व्यापक आर्थिक, राजकीय आणि सामाजिक चळवळ सुरु करण्याची शपथ घेण्याची गरज आहे.
बेरोजगारीच्या वाढत्या समस्येमुळे आपल्या राष्ट्रीय समाज मनात एक निराशा आणि खिन्नतेची भावना निर्माण झाली आहे. एका बाजूला लाखो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला कोट्यावधी युवक, युवती नोकऱ्या मिळवण्याची वाट पाहत आहेत, जे त्यांच्यासाठी एक मृगजळच ठरत आहे. मूठभर नफोखोर कॉर्पोरेट कंपन्यांना शक्तीशाली बनविण्यासाठी काम करणारी राष्ट्रीय आर्थिक धोरणे परतवल्याशिवाय आणि भारतातील सर्वसामान्य लोकांची क्रयशक्ती वाढविल्याशिवाय ही राक्षसी राष्ट्रीय समस्या सोडवली जाऊ शकत नाही. म्हणूनच विद्यार्थी, युवा आणि कामगार वर्गाने ह्या स्वातंत्र्य दिनी ही विनाशकारी धोरणे परतवून लावण्यासाठी एक संयुक्त आणि सातत्यपूर्ण चळवळ सुरु करण्याची शपथ घेतली पाहिजे.
केंद्रातील जन-विरोधी धोरणांच्या विपरीत त्रिपुराचे राज्य सरकार, त्याच्यावर अनेक मर्यादा असूनही प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या, विशेषत: दडपलेल्या शोषित समाज घटकांच्या कल्याणासाठीची धोरणे राबवित आहे, आणि त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. हा संपूर्णपणे एक वेगळा आणि पर्यायी मार्ग आहे. हा मार्ग केवळ त्रिपुराच्याच लोकांनाच आकर्षित करून घेत नाही तर त्या मार्गाला देशभरातील दलित श्रमिकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्रिपुरातील प्रतिक्रियावादी शक्तीं हे सहन करू शकत नाहीत. म्हणूनच लोकांचे शत्रू शांतता, भातृभाव आणि राज्याची अखंडता भंग करण्याचे कारस्थान सातत्याने करत असतात. त्याचवेळी विकासकामांना खीळ घालण्याचाही प्रयत्न ते करत असतात. या सर्व अपवित्र कारस्थानांना आपण उत्तर देण्याची आणि प्रतिक्रियावादी शक्तींना एकटे पाडण्याची गरज आहे. ह्या पार्श्वभूमीवर, या स्वातंत्र्यदिनी, त्रिपुराच्या सर्व विचारी, शांतताप्रिय आणि विकास हवा असणाऱ्या लोकांनी पुढे येण्याची आणि अशा सर्व फूटपाड्या विघातक ताकदींच्या विरोधात संघटितपणे लढण्याची शपथ घेतली पाहिजे. 

अनुवाद- शुभा शमीम
------------------------------------------------------------------------------------------------------------------ वरील लेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या 'जीवन मार्ग' या मुखपत्रात छापून आला आहे. असे वैचारिक लेख वाचण्यासाठी जीवन मार्गचे वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी आहे- रुपये ४००/- आपला पत्ता मेल करा पुढील आयडी वर- mahacpim@gmail.com

' 022-24951576 / Fax: 022-24961525

आपण खालील बँक खात्यात वर्गणी भरू शकता-

Jeevan Marg
 
A/C Number- 04220100009541

 IFSC CODE- BARBOWRLIX

 Bank of Baroda, Worli Branch
----------------------------------------------------------------------------------------------------------------------                                      

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी (१) - सी. पी. भांबरी

ऐतिहासिक कर्जमाफी की ऐतिहासिक फसवणूक?

मोदी सरकार : शेतकऱ्यांशी केलेल्या गद्दारीची तीन वर्षे!